(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. “वाटचाल दृष्यमान शाश्वत स्वच्छतेकडे” या घोषवाक्याखाली हे अभियान संपूर्ण राज्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात आणले जाणार आहे.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करून गावांची सर्वांगीण स्वच्छता सुनिश्चित करणे, तसेच ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणे हे आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना तालुकानिहाय नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतींनी गावात दवंडी देणे, शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय आदी ठिकाणी माहितीपत्रके लावणे, तसेच ग्रामसभा घेऊन नागरिकांना अभियानाची माहिती देणे अपेक्षित आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ मे रोजी ग्रामसभा आयोजित करून संकलित ओला कचरा नॅडेप खड्ड्यात टाकण्यात येणार असून त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.
या अभियानाचे नियंत्रण गटविकास अधिकारी करणार असून प्रकल्प संचालक, तालुका सल्लागार, विस्तार अधिकारी, गट समन्वयक आदी यामध्ये सहभागी राहणार आहेत. यामध्ये महिला बचतगट, युवक मंडळे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग देखील राहणार आहे.
“गावातील कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे,” असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.