( मुंबई )
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून भाजपने 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. शरद पवार गटाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चा आणि जागावाटपावरील रस्सीखेचीनंतर अखेर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. 17 जागांच्या अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजपच्या उमेदवारांच्या यादीत सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखाणी यांचाही समावेश आहे. वर्धा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला असून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी
- वर्धा – अरुण लखाणी
- भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राम्हणकर
- अमरावती – प्रवीण पाटील
- सांगली-सातारा – धैर्यशील कदम
- सोलापूर – राजेंद्र राऊत
- अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे
- संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट
- नांदेड – अमर राजूरकर
- धाराशीव-लातूर-बीड – बसवराज पाटील
- जळगाव – नंदकिशोर महाजन
विधान परिषद पोटनिवडणूक
- नागपूर – डॉ. राजीव पोतदार
प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीची सर्वाधिक चर्चा
या यादीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत प्राजक्त तनपुरे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री असलेल्या तनपुरे यांनी 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे, पक्षप्रवेशानंतर अवघ्या 24 तासांत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेना सुरुवातीला 7 जागांवर ठाम असल्याचे सांगितले जात होते. मागील निवडणुकीतील 5 जागा कायम ठेवण्यासह 2 अतिरिक्त जागांची मागणीही करण्यात आली होती. मात्र अंतिम वाटाघाटींमध्ये शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अतिरिक्त एक जागा आपल्या वाट्याला आणल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यातील आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरील चर्चेनंतर अखेर 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला.

