( नवी दिल्ली )
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अखेर ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावरील चर्चेनंतर आणि संभाव्य सुरक्षा त्रुटींच्या दाव्यांनंतर मंडळाने अधिकृत निवेदन जारी करत संबंधित पोर्टलमधील त्रुटींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले.
CBSE ने म्हटले आहे की, OSM पोर्टलमध्ये आढळलेल्या सुरक्षाविषयक त्रुटी दूर करण्यासाठी विविध सरकारी संस्था तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्थांतील (IIT) सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहे. प्राथमिक तपासणीत समोर आलेल्या त्रुटींवर नियंत्रण मिळवण्यात आले असून इतर संभाव्य असुरक्षित बाबी शोधून त्यावर उपाययोजना सुरू आहेत.
सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ऑन-स्क्रीन मार्किंग पोर्टल अधिक सुरक्षित तांत्रिक संरचनेवर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
एथिकल हॅकर्सचे CBSE कडून कौतुक
संभाव्य सुरक्षा त्रुटी निदर्शनास आणून देणाऱ्या सतर्क नागरिकांचे आणि एथिकल हॅकर्सचे CBSE ने विशेष आभार मानले आहेत. मंडळाने काही व्यक्तींशी थेट संपर्क साधून सुरक्षा सुधारण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. याशिवाय, पोर्टलमध्ये आणखी कोणतीही सुरक्षा त्रुटी अथवा तांत्रिक समस्या आढळल्यास त्या CBSE च्या सुरक्षा पथकाला ई-मेलद्वारे कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा शोधून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
काय आहे संपूर्ण वाद?
या प्रकरणाला सुरुवात झाली ती 19 वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी यांच्या दाव्यामुळे. त्यांनी CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रक्रियेशी संबंधित उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका ‘AWS Bucket’ वर सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्याचा आरोप केला होता. या दाव्यानंतर CBSE च्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
दरम्यान, इयत्ता बारावीतील 17 वर्षीय विद्यार्थी सार्थक सिद्धांत यानेही निविदा प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले. त्याच्या म्हणण्यानुसार, ऑन-स्क्रीन मार्किंगसाठी कंत्राट देताना काही महत्त्वाच्या पात्रता अटी आणि सुरक्षा निकष शिथिल करण्यात आले. त्यामुळे हैदराबादस्थित ‘कोएम्प्ट एज्युटेक’ कंपनीला हे कंत्राट मिळाल्याचा दावा त्याने केला आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर देशभरात चर्चा
उत्तरपत्रिका सुरक्षिततेचा मुद्दा, डिजिटल मूल्यमापन प्रणाली आणि सायबर सुरक्षेशी संबंधित प्रश्नांमुळे CBSE च्या तांत्रिक व्यवस्थेवर देशभरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र मंडळाने सुरक्षा त्रुटींवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

