(मुंबई)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाने आज राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली. भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रमुख आणि निवडणुका प्रभारींची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली. सर्वच जिल्ह्यांतील महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई या सर्व ठिकाणी गणेश नाईक निवडणूक प्रभारी असणार आहेत. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाईक यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून विनय नातू यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडणुकीची घोषणा होताच भाजप दंड थोपटून मैदानात उतरला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. बीड जिल्हा निवडणूक प्रमुख पदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर सातारा जिल्ह्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे, सांगली जिल्ह्यात आमदार सत्यजित देशमुख, कोल्हापुरात आमदार अमल महाडिक यांच्यावर जबाबदारी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यभरात जिल्हानिहाय या निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली आहे. पक्ष संघटनाला गती देत निवडणुकीपूर्व तयारीसाठी ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत

