(अहमदाबाद)
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 156 धावांचे लक्ष्य 18 षटकांत 5 गडी गमावून सहज गाठले.
विशेष म्हणजे, 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2025 मध्ये प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीने यंदाही विजेतेपदावर आपली मोहोर उमटवत सलग दुसरा किताब आपल्या नावावर केला. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली.
विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीला विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या 4.3 षटकांत 62 धावांची सलामी भागीदारी करत सामन्याची दिशा सुरुवातीलाच निश्चित केली. व्यंकटेश अय्यरने 16 चेंडूत 32 धावा केल्या, तर विराट कोहलीने संयमी आणि जबाबदारीपूर्ण फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.
देवदत्त पडिक्कल (1), रजत पाटीदार (15) आणि कृणाल पांड्या (1) यांना मोठी खेळी करता आली नाही. मात्र कोहलीच्या खेळीमुळे आरसीबीने लक्ष्य सहज पार केले आणि पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी उंचावली.
त्याआधी गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 156 धावा केल्या. संघाचे प्रमुख फलंदाज शुभमन गिल आणि साई सुदर्शन स्वस्तात बाद झाल्याने गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरने 37 चेंडूत 50 धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले.
आरसीबीच्या गोलंदाजांमध्ये रसिक सलाम दारने सर्वाधिक तीन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन, तर कृणाल पांड्याने एक बळी मिळवला.

विजेत्या-उपविजेत्या संघांवर कोट्यवधींचा वर्षाव
आयपीएल 2026 साठी एकूण 46.5 कोटी रुपयांचा बक्षीस निधी निश्चित करण्यात आला होता. विजेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीला तब्बल 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये मिळाले. प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या इतर संघांनाही मोठी रक्कम देण्यात आली. क्वालिफायर-2 मध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सला 7 कोटी रुपये, तर एलिमिनेटरमध्ये बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादला 6.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
IPL 2026 वैयक्तिक पुरस्कारांची बक्षीस रक्कम
संघांच्या पुरस्कारांबरोबरच खेळाडूंनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आकर्षक रोख बक्षिसे देण्यात आली.
• ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – 10 लाख रुपये
• पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) – 10 लाख रुपये
• मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – 10 लाख रुपये
• सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – 10 लाख रुपये
• इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन – 20 लाख रुपये
सलग दुसऱ्या विजेतेपदासह आरसीबीने आयपीएलमधील आपले वर्चस्व अधिक मजबूत केले असून, विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली संघाने इतिहास रचला आहे.
2008 ते 2026 पर्यंत कोणत्या संघांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी?
चेन्नईचा फायनलमध्ये सर्वाधिक दबदबा
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक 10 वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सने 6 वेळा, तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने 4 वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, चेन्नईने 10 पैकी 5 वेळा विजेतेपद पटकावत तितक्याच वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
मुंबईने जिंकल्या 6 पैकी 5 फायनल
मुंबई इंडियन्सचा अंतिम सामन्यातील विक्रमही तितकाच प्रभावी आहे. संघाने खेळलेल्या 6 फायनलपैकी तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 4 फायनलमध्ये प्रवेश करत 3 वेळा विजेतेपद पटकावले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघानेही 4 वेळा अंतिम फेरी गाठली असून 2025 मध्ये पहिले विजेतेपद जिंकत इतिहास रचला.
गुजरात टायटन्सचीही दमदार कामगिरी
दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी एकदा आयपीएल फायनल खेळली आहे. 2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मात्र, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरी गाठूनही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
दरम्यान, 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने अल्पावधीतच आपली छाप पाडली आहे. संघाने आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरी गाठली असून 2022 मध्ये विजेतेपदही पटकावले आहे.

