( कोलकाता )
टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील निर्णायक सामन्यात भारतीय संघने दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. संजू सॅमसनच्या 97 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने 196 धावांचे आव्हान 19.2 षटकांत पूर्ण करत सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. हा सामना ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. आता भारताचा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध होणार आहे.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीस भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट्स घेत विंडीजवर दबाव कायम ठेवला. मात्र, निर्णायक क्षणी जेसन होल्डर आणि रोवमॅन पॉवेल यांनी संयमी पण आक्रमक खेळी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी अवघ्या 35 चेंडूंमध्ये नाबाद 76 धावांची भागीदारी रचली. त्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत 4 विकेट्स गमावत 195 धावांची मजबूत मजल गाठली. पॉवेलने 34, तर होल्डरने नाबाद 37 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने केलेल्या चाबूक खेळीमुळे भारताने सामना पूर्ण नियंत्रणात ठेवत विजय मिळवला. संजूने नाबाद 97 धावांची दमदार खेळी करत संघाला सहज विजयाकडे नेले. त्याला इतर फलंदाजांचीही साथ मिळाली, मात्र संपूर्ण सामन्यात संजूच भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला.
वेस्ट इंडिजची 195 धावांची मजल
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला कर्णधार शो होप आणि रोस्टन चेज यांनी भक्कम सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मात्र वरुण चक्रवर्तीने पहिली विकेट घेत भारताला यश मिळवून दिले. डावाच्या मध्यात जसप्रीत बुमराहने एका षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्याचा कल बदलला. तरीही अखेरीस जेसन होल्डर आणि रोवमॅन पॉवेल यांनी 76 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला 195 धावांपर्यंत पोहोचवले.
संजू सॅमसनचा ऐतिहासिक डाव
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात संथ झाली. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर संजू सॅमसनने सामन्याची सूत्रे हातात घेतली. संजूने अवघ्या 26 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत सामना भारताच्या बाजूने झुकवला. तिलक वर्मासोबत त्याने महत्त्वाची भागीदारी केली. अखेरीस हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतरही संजूने संयम राखत आक्रमक खेळी सुरू ठेवली. 19.2 षटकांत भारताने 5 विकेट्स गमावत 199 धावा करत सामना जिंकला. संजू सॅमसन 97 धावांवर नाबाद राहिला आणि सामन्याचा निर्विवाद नायक ठरला.
अभिषेक-ईशान फ्लॉप, पण भारत सेमीफायनलमध्ये
अभिषेक शर्मा आणि ईशान किशनकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. दोघेही 10-10 धावांवर बाद झाले. मात्र संजू सॅमसनच्या एकहाती खेळीमुळे भारताने सुपर-8 फेरी यशस्वीरीत्या पार केली. आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष 5 मार्चच्या सेमीफायनलकडे लागले असून वानखेडेवर भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगणार आहे.

