(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथे बौद्धजन विकास कमिटी (स्थानिक व मुंबई), क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मानका आप्पा समिती, डीसीसी क्रिकेट क्लब आणि मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांचा ९१ वा स्मृतिदिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष जनार्दन कांबळे तसेच प्रमुख पाहुण्या रेशम जाधव (समाजसेवा अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवेज कांबळे यांनी केले.
यानंतर श्रामणेर व बौद्धाचार्य अरविंद कांबळे, बौद्धाचार्य विरेंद्र कांबळे तसेच मीना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध पूजापाठ संपन्न झाला. माता रमाई यांच्या जीवनकार्यावर विद्रोही कवी राकेश कांबळे आणि धम्म उपासिका प्राची कांबळे यांनी प्रभावी विचार मांडले.
यावेळी सन २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र कांबळे यांनी केले.
कार्यक्रमातील देहदान-नेत्रदान जनजागृती सत्राला विशेष प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून प्रेरित होत छाया सिताराम कांबळे आणि सिताराम भागा कांबळे यांनी मरणोत्तर देहदानाचा महत्त्वपूर्ण व समाजासाठी प्रेरणादायी निर्णय जाहीर केला. त्यांच्या या उदात्त संकल्पाबद्दल विल्ये कमिटीतर्फे सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष जनार्दन कांबळे, प्रमुख पाहुण्या रेशम जाधव आणि पूजा जाधव उपस्थित होत्या.
तसेच डीसीसी आयोजित क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डीसीसी संघाचा क्रिकेटपटू संकेत कांबळे, प्रेम कांबळे आणि लक्षद्वीप कांबळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
विल्ये गावचे सुपुत्र, लेखक-दिग्दर्शक सुधीर कांबळे यांच्या “पेढा” या लघुपटाची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फेस्टिव्हल पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळाचे आजी-माजी कलाकार, गायक, डीसीसी क्रिकेट क्लबचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विल्ये मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी तसेच सर्व कार्यकर्ते व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

