(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागात आयोजित ‘वास्तविक अभिनय’ विषयावरील सहा दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत प्रा. डॉ. मिलिंद इनामदार यांनी विद्यार्थ्यांना सहज, नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयाची तंत्रे उलगडून सांगितली.
रत्नागिरीतील अनेक नामवंत कलाकार या महाविद्यालयातून घडले असून ते आज मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी परफॉर्मिंग आर्ट्स विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागामार्फत विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात.
याच उपक्रमांतर्गत २२ ते २७ जून दरम्यान आयोजित कार्यशाळेत राष्ट्रीय नाट्य विद्यालय (दिल्ली)चे माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाच्या थिएटर विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. मिलिंद इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान त्यांनी अभिनय करताना अनावश्यक अतिरेक टाळून सहज आणि वास्तववादी अभिनय कसा करावा, याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी विविध उपक्रमही घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. डॉ. इनामदार यांनीही त्यांच्या प्रश्नांची सोप्या आणि समर्पक भाषेत उत्तरे दिली.
या कार्यशाळेमुळे अभिनयातील बारकावे समजलेच, शिवाय कोणत्याही विषयाकडे अधिक सखोलपणे पाहण्याची आणि त्यातील विविध पैलू शोधण्याची दृष्टी मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. भविष्यात रत्नागिरीतून अधिकाधिक गुणवान कलाकार घडावेत आणि जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध व्हावा, अशा शुभेच्छाही डॉ. मिलिंद इनामदार यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि परफॉर्मिंग आर्ट्स विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, समन्वयक डॉ. मीनल खांडके तसेच प्रा. हरिश केळकर, प्रा. साई जिरोळे, प्रा. कश्मीरा सावंत, प्रा. ओंकार रसाळ आणि प्रा. रमा रानडे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

