(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पालीजवळील नागलेवाडी परिसरात सुरक्षिततेच्या नावाखाली उभारण्यात आलेली व्यवस्था आता उलट वाहनचालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे. उतारावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी तुटलेले आणि वाकलेले बॅलर उभे करण्यात आले आहेत. मात्र, रात्रीच्या अंधारात हे बॅलर सहज नजरेस न पडल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लांजा तालुक्यात नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताने अनेक निष्पापांचे बळी घेतले असतानाही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक त्रुटी दूर करण्याबाबत संबंधित यंत्रणांना अद्याप जाग आलेली दिसत नाही. पालीजवळील नागलेवाडी परिसरात उतारावर वाहनांचा वेग कमी करण्याच्या नावाखाली रस्त्यावर तुटलेले आणि वाकलेले बॅलर उभे करण्यात आल्याने रात्रीच्या अंधारात अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. ‘जखमेपेक्षा इलाज भयंकर’ अशी अवस्था निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी आणि संबंधित प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ईगल कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता आधीच संशयाच्या भोवऱ्यात आहे. अनेक ठिकाणी अपूर्ण कामे, उखडलेले रस्ते, धोकादायक वळणे आणि अपुरी सूचना फलक यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. त्यात आता नागलेवाडीतील तुटलेले बॅलर म्हणजे अपघाताला खुले निमंत्रणच ठरत आहे. ठेकेदार कंपनीवर कोणाचेच नियंत्रण उरले नसल्याचे चित्र दिवसेंदिवस अधिक ठळक होत आहे. महामार्गावरील अपघातांची संख्या सातत्याने वाढत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी केवळ तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात असल्याने जनतेच्या सुरक्षिततेपेक्षा कागदोपत्री कामांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका होत आहे.
या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधींची भूमिकाही तितकीच निराशाजनक ठरत आहे. नागरिकांच्या जीवाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा अपेक्षित असताना स्थानिक आमदार आणि जबाबदार यंत्रणा यांचे मौन अधिकच खटकणारे आहे. अपघात घडल्यानंतर पंचनामे, चौकशा आणि आश्वासनांचा पाऊस पाडण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच दूर करणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. महामार्ग हा प्रवास सुलभ करण्यासाठी असतो; जीव धोक्यात घालण्यासाठी नव्हे. नागलेवाडीतील हा जीवघेणा सापळा तातडीने हटवून सुरक्षिततेची प्रभावी उपाययोजना केली नाही, तर एखादा निष्पाप जीव गेल्यानंतर जागे होणाऱ्या यंत्रणेकडे उत्तर देण्यासाठी कोणतेही समाधानकारक कारण उरणार नाही.

