(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण, समाजकार्य, सहकार क्षेत्र आणि शिक्षक चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले निलेश कुंभार यांना नुकतीच दिल्ली येथे सेडरब्रुक युनिव्हर्सिटी, यूएसएतर्फे मानद पीएचडी (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला आहे.
निलेश कुंभार हे गेली २५ वर्षे भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी लढणाऱ्या शासनमान्य शिक्षक भारती संघटनेचे ते गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा कार्यवाहक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुणे येथील यशदा आणि छत्रपती संभाजीनगर येथील मीपा येथेही त्यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ राज्यभरातील अनेक शिक्षकांना झाला आहे.
सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक आणि चेअरमन म्हणून कार्य करताना संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी दूरदृष्टीने काम केले. पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.
याशिवाय जिल्हा शांतता समितीचे सदस्य म्हणून सामाजिक सलोखा, शांतता आणि जनजागृतीसाठीही ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणि आदर्श पर्यावरण शिक्षक यांसारखे विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
एक उत्कृष्ट समालोचक म्हणूनही त्यांनी जिल्हा आणि राज्यस्तरीय अनेक कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन व समालोचन करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
शिक्षण, समाजकार्य, सहकार आणि शिक्षक चळवळीतील त्यांच्या बहुआयामी योगदानाचा गौरव म्हणून त्यांना मानद पीएचडी प्रदान करण्यात आली असून, या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

