(खेड)
खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात आज (शनिवार) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलारे आयणी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ एयू ८७८४) घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. रिक्षा आठवडा बाजार परिसरात पोहोचताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत नवीन कदम (रा. नांदिवली, ता. खेड) यांचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जागीच मृत्यू झालेले नवीन कदम रिक्षामधून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा आणि खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून पंचनामा करण्यात आला आहे.
या भीषण अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

