( रत्नागिरी / वार्ताहर )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने आयोजित कॅट ‘सी’ – ३१६ एनसीसी प्रशिक्षण शिबिरात सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या प्रशिक्षण शिबिरात विविध शाळा व महाविद्यालयांतील सुमारे ३५० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. शिबिरादरम्यान आयोजित सांस्कृतिक आणि गुणदर्शन स्पर्धांमध्ये जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विद्यालयातील कॅडेट भक्ती मांडवकर हिने एकल नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच समूह नृत्य स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आकर्षक सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळवला.
प्रशिक्षण शिबिरात कॅडेट्सना ड्रिल, रायफल फायरिंग, शारीरिक प्रशिक्षण, नकाशा वाचन, फील्डक्राफ्ट, शस्त्र हाताळणी तसेच विविध लष्करी कौशल्यांचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कॅडेट्समध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची प्रेरणा निर्माण झाली.
शिबिरादरम्यान ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज एल. तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एनसीसी एएनओ सौ. स्नेहल पावरी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांनी सर्व कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

