(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
नवजात बाळाच्या आरोग्यसंपन्न आयुष्याची सुरुवात ‘आईच्या दूधाने’च होत असल्याची जाणीव देत दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह’ साजरा केला जातो. “शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू” या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह यंदा “स्तनपानाला प्राधान्य द्या : शाश्वत सहाय्यक व्यवस्था तयार करा” या घोषवाक्याखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये साजरा होत आहे.
स्तनपानाचा अभाव म्हणजे बाळाच्या आरोग्याला थेट धोका. अशा बाळांमध्ये कुपोषण, आजारपण आणि दुर्दैवाने मृत्यूची शक्यता वाढते. याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा आरोग्य विभागामार्फत जनजागृतीला विशेष गती देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी अध्यक्षीय भूमिका पार पाडली. कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसिम सय्यद, सहाय्यक प्राध्यापक डॉ. शायन पावसकर व डॉ. आदित्य वडगावकर, माध्यम अधिकारी नामदेव बेंडकुळे, अधिसेविका जयश्री शिरधनकर, पीएचएन माया सावंत यांच्यासह आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्तनपानाचे महत्त्व उलगडणारी माहितीचित्रफीत दाखवण्यात आली.
‘आईचे दूध हे अमृतासमान’ – डॉ. आठल्ये
“प्रसूतीनंतर एका तासाच्या आत दिलेले चीकदूध म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण आहे. हे दूध बाळाला रोगप्रतिकारशक्ती देऊन आजारांपासून वाचवते. पहिल्या सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान आणि त्यानंतर पूरक आहारासह सततचे स्तनपान बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. आठल्ये यांनी केले.
आईसाठीही फायदेशीर
स्तनपान केवळ बाळासाठीच नव्हे, तर आईसाठीही अनेक पातळ्यांवर लाभदायक ठरते. स्तनपानामुळे आई-बाळामधील भावनिक नातं दृढ होते. नैसर्गिकरीत्या वजन कमी होण्यास मदत होते. तसेच स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. गर्भाशय पूर्वस्थितीत येतो, असेही वैद्यकीय तज्ञांनी नमूद केले.
‘हिरकणी कक्षां’मुळे मातांना दिलासा
स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये मातांना सुरक्षित आणि गोपनीय वातावरणात स्तनपान करता येईल. आशा व आरोग्यसेविका आवश्यक मार्गदर्शनही देणार आहेत. याशिवाय सरकारी व खाजगी कार्यालये, दवाखाने, रेल्वे व बस स्थानके, मॉल्स आदी ठिकाणीही अशा कक्षांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. “सर्व स्तनदा मातांनी या सुविधांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.