(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबतचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला असून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीतही पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली. हे स्थानक तालुक्याचे प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. मात्र, भव्य इमारतीच्या तुलनेत प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून केवळ एक लहान प्लास्टिकचा जार ठेवण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये पाणी नसून त्यावर धुळीचे थर साचलेले आहेत. अनेक दिवसांपासून या सुविधेकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्र झळा सहन करत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसत बसून खाजगी दुकानांचा आधार घ्यावा लागत आहे.
विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या गैरसोयीचा सर्वाधिक फटका बसत आहे. उन्हाच्या कडाक्यात लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना साध्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रवाशांकडून नियमितपणे तिकीट शुल्क आकारले जात असताना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मे महिन्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकात २४ तास स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याने एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रवाशांच्या वाढत्या नाराजीची दखल घेत प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तसेच बसस्थानकातील इतर मूलभूत सुविधांचाही आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

