(जाकादेवी / संतोष पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद-खंडाळा आणि सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी श्रामणेर शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहारात सुरू झालेल्या या शिबिरात २० पुरुष शिबीरार्थी आणि १२ मुली सहभागी झाल्या आहेत.
बौद्ध धम्मात भंते संघ हे धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत असतात. त्यामधील ‘श्रामणेर’ ही भंते संघातील पहिली आणि महत्त्वपूर्ण पायरी मानली जाते. धार्मिक जीवनाची शिस्त, बुद्ध तत्वज्ञानाची सखोल माहिती आणि प्रत्यक्ष अनुभूती मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारच्या निवासी श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची संकल्पना वाटद-खंडाळा येथील नामांकित क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव यांनी मांडली असून समाजातील विविध स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले जात आहे. १५ ते ५५ वर्षे वयोगटातील धम्म बांधव या शिबिरात सहभागी झाले आहेत.
१० दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरात अजाहत मिलिंद बोधी (जेहूर, अहमदनगर), भंते संघकीर्ती मुनी (बुद्धगया, बिहार) आणि भिक्खू परमानंद (पुणे) यांचे सखोल मार्गदर्शन लाभत आहे.
आधुनिक काळातील युवा पिढीमध्ये धार्मिक प्रगल्भता निर्माण व्हावी, सामाजिक व धार्मिक नेतृत्व विकसित व्हावे तसेच घातक रूढी-परंपरांपासून दूर राहून बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करावा, या उद्देशाने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिरासाठी आवश्यक सर्व सुविधा डॉ. राजेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक दानशूर व्यक्तींनीही सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेश महादेव जाधव, बावीस खेडी संघटनेचे अध्यक्ष सुनील उर्फ भाई जाधव, सचिव कुलदीप जाधव, बौद्धाचार्य दीपक गमरे, बौद्धाचार्य संदीप जाधव, बौद्धाचार्य सुवेश चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, तालुका सचिव सुहास कांबळे, शिक्षक सुरेश सुर्वे, स्वप्नील जाधव, फोटोग्राफर नितीन सुर्वे, दीपक पवार तसेच आदर्श शिक्षिका सौ. ऋतुजा राजेश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत.

