(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युनिक डिसअॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले असून, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर आवश्यक प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान व शासकीय लाभ थांबविण्यात येणार असल्याची स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे.
शासनाच्या पारदर्शक आणि अचूक लाभवितरण व्यवस्थेला गती देण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. अद्याप अनेक दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधारशी संलग्न केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ सुरळीत पोहोचावा आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा बसावा, या उद्देशाने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार, ज्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड आधारशी जोडलेले नाही किंवा ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांचे १ एप्रिलपासून अनुदान बंद होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार लिंकिंग अनिवार्य मानले जात आहे. केंद्र सरकारकडून दिले जाणारे यूडीआयडी कार्ड हे दिव्यांगांसाठी एकसमान राष्ट्रीय ओळखपत्र असून, त्याद्वारे देशभरातील शासकीय योजनांचा लाभ एका कार्डवर घेता येतो. या कार्डमध्ये लाभार्थ्याच्या दिव्यांगत्वाचा प्रकार, त्याची टक्केवारी आणि वैयक्तिक माहिती नोंदवलेली असते.
पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी २,५०० रुपयांचे अनुदान मिळणार असून, त्यासाठी यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम मुदत संपण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसीसाठी लाभार्थी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊ शकतात. याशिवाय शासनाने UDID या मोबाइल अॅपद्वारेही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी स्वतःच्या मोबाइलवरून अॅप डाउनलोड करून आधार क्रमांक अद्ययावत करू शकतात. मात्र, त्यासाठी आधार कार्ड, यूडीआयडी कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.

