(मुंबई)
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर महायुतीतील समीकरणे बदलताना दिसत आहेत. या जागेच्या बदल्यात शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्रीपदाची मागणी करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे आपल्या पुत्र अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेत संधी मिळावी यासाठी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जागावाटपाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री अदिती तटकरे यांनी या पदावर दावा केला होता, तर शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली होती.
रायगड हा तटकरेंचा बालेकिल्ला मानला जात असला तरी जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार संख्येने अधिक असल्याने हे पद शिवसेनेकडेच द्यावे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे बोलले जात होते.
सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर गेल्या सव्वा वर्षांपासून रायगडचे पालकमंत्रीपद रिक्तच आहे.
विधानपरिषद निवडणुकीतून नवे राजकीय समीकरण?
आता विधानपरिषद जागावाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा पुढे आणण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन त्याबदल्यात रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून रखडलेला पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत असून महायुतीतील नवे राजकीय समीकरण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

