(नवी दिल्ली)
भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय संबंध आता धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. जर्मन चांसलर फ्रिड्रिख मेर्ज़ यांच्या अलीकडील भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांनी “भारत–जर्मनी सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारी” जाहीर केली आहे. हा केवळ गुंतवणूक करार नसून बहुस्तरीय सहकार्याचा आराखडा असून, युरोपातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक ताकदीचा भारताला थेट लाभ मिळणार आहे. या भागीदारीमुळे भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी नवे दालन खुले होणार आहे.
सध्या सेमीकंडक्टर हे आर्थिक स्पर्धा, राष्ट्रीय सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक बनले आहेत. जागतिक चिप उत्पादनात तैवान, चीन आणि अमेरिका आघाडीवर असले तरी जर्मनीची भूमिका केंद्रस्थानी आहे. “जर्मनी तैवान किंवा दक्षिण कोरियासारखी थेट चिप उत्पादनात पुढे नाही, पण चिप उत्पादन उपकरणे, रसायने आणि अचूक अभियांत्रिकी या क्षेत्रात ती अत्यंत मजबूत आहे,” असे प्रिमस पार्टनर्सचे सह-संस्थापक आणि सीईओ देवरूप धर यांनी सांगितले.
जर्मनीत इन्फिनियन टेक्नॉलॉजीजसारखी आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी असली तरी या भारत–जर्मनी भागीदारीत अद्याप मोठ्या फॅब गुंतवणुकीच्या घोषणा झालेल्या नाहीत. मात्र तज्ज्ञांच्या मते, या कराराचं खरे महत्त्व दीर्घकालीन तंत्रज्ञान हस्तांतरणात आहे. “एका सेमीकंडक्टर फॅबसाठी 10 ते 20 अब्ज डॉलर्स खर्च येतो आणि ती पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण केवळ फॅब असून चालत नाही. डिझाइन, पॅकेजिंग, चाचणी, उपकरणे आणि साहित्य यांचं सखोल ज्ञान असेल, तेव्हाच खरी सेमीकंडक्टर परिसंस्था तयार होते,” असं धर यांनी स्पष्ट केलं.
तज्ज्ञांच्या मते, जर्मनीकडे औद्योगिक सेमीकंडक्टर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह चिप्स आणि अचूक उत्पादन प्रणालींचा मोठा अनुभव आहे. हा अनुभव भारतासाठी निर्णायक ठरू शकतो. सध्या मंजूर झालेल्या अनेक भारतीय सेमीकंडक्टर प्रकल्पांना अत्याधुनिक तंत्रज्ञान भागीदारी मिळवताना अडचणी येत आहेत. त्यांना जुनी तंत्रज्ञानं देणाऱ्या आशियाई भागीदारांवर अवलंबून राहावं लागत आहे. भारत–जर्मनी करारामुळे पुढील पिढीच्या लॉजिक, मेमरी आणि डिस्प्ले तंत्रज्ञानासाठी नवे पर्याय खुले होण्याची शक्यता आहे.
आज भारताची सर्वात मोठी ताकद चिप डिझाइनमध्ये आहे. जागतिक सेमीकंडक्टर डिझाइन मनुष्यबळापैकी जवळपास 20 टक्के योगदान भारतातून होत आहे. मात्र उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित कौशल्य ही मोठी कमतरता राहिली आहे. हीच पोकळी भरून काढण्यासाठी भारत–जर्मनी भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.
भारत–अमेरिका व्यापारी संबंधांतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जर्मनीसोबत वाढतं सहकार्य भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अधिक महत्त्वाचं ठरत आहे. G7 देशांना चिप उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात बाह्य देशांवर अवलंबून राहावं लागत आहे. अनेक देशांमध्ये देशांतर्गत मागणीपैकी 50 टक्क्यांहून अधिक भाग आयातीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत–जर्मनी सेमीकंडक्टर भागीदारी ही केवळ करार न राहता, दीर्घकालीन जागतिक पुरवठा साखळीतील भारताची भूमिका मजबूत करणारी ठरू शकते.

