(खेड/ रत्नागिरी)
जमावबंदी आदेश लागू असतानाही एकत्र जमून पुतळा जाळत घोषणाबाजी करून दंगा घडवून आणल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्यात दर्यासारंग संघटनेतील २९ जणांची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल अनेक वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल २२ मे रोजी खेड न्यायालयाने दिला.
या प्रकरणी अखिल दाभोळ खाडी भोई समाज संघटनेचे पदाधिकारी तथा सोनगाव येथील रहिवासी दिपक पारधी यांनी फिर्याद दाखल केली होती. दाभोळ खाडी परिसरातील चार तालुक्यांतील ४२ गावांतील भोई समाज बांधवांची ‘अखिल दाभोळ खाडी भोई समाज’ ही संघटना कार्यरत असून समाजातील विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम केले जाते.
फिर्यादीनुसार, २७ जानेवारी २०१९ रोजी संशयित आरोपी सुनील सखाराम जाधव यांच्यासह २९ जणांनी समाजातील काही व्यक्तींना वाळीत टाकल्याचा आरोप करत मोर्चा काढला होता. यावेळी संबंधितांचे पुतळे तयार करून त्यांना चप्पलांनी मारहाण करत सार्वजनिकरीत्या जाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच घोषणाबाजी करून वातावरण तणावपूर्ण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. दरम्यान, त्यावेळी जमावबंदी आदेश लागू असतानाही सुमारे २०० जणांचा जमाव जमवण्यात आल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४९, ५००, ५०४, ५०६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. बचाव पक्षाकडून ॲड. सुधीर शरद बुटाला आणि ॲड. समीर शरद सेठ यांनी साक्षीदारांचा प्रभावी उलटतपास घेतला. पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार केल्यानंतर खेड न्यायालयाने दर्यासारंग संघटनेतील सर्व २९ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. या निकालामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या प्रकरणाचा अखेर पडदा पडला आहे.

