(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादाने अखेर हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात तिघा नातेवाईकांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्व येथील रहिवासी पम्मी फलचंद जयस्वार (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आई पार्वती मासये यांच्या मालकीच्या जागेच्या वारस तपासावरून काही नातेवाईकांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर पम्मी जयस्वार या आई पार्वती मासये, मुलगा मेघराज आणि बहीण पुष्पा पुजारी यांच्यासह राजापूर येथे आल्या होत्या. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास तिवंडमाळ येथे आरोपी वैभव मासये याने फिर्यादींना अडवत अश्लील शिवीगाळ केली. “तुम्ही पुन्हा मुंबईला जिवंत जाणार नाही,” अशी धमकी देत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
यानंतर दुसऱ्याच दिवशी, २६ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पम्मी जयस्वार या आधारकार्ड आणण्यासाठी आई, मुलगा आणि बहिणीसह मांडरुळ गणेशवाडी येथे आरोपी मंगल बाबुलाल हडाळे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मानसी वैभव मासये हिने संतापाच्या भरात पम्मी जयस्वार, त्यांचा मुलगा मेघराज, बहीण पुष्पा पुजारी आणि आई पार्वती मासये यांच्यावर लाकडी बांबू व पाईपने हल्ला चढवला. या मारहाणीत चौघेही गंभीर जखमी झाले असून, महिलांनाही कोणतीही दया न दाखवता बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपींकडून पुन्हा शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी २७ मे रोजी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मंगल बाबुलाल हडाळे (वय ५०), मानसी वैभव मासये (वय २३) आणि वैभव मासये (रा. मांडरुळ गणेशवाडी, ता. राजापूर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

