(पोलादपूर / शैलेश पालकर)
यंदा 9 मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेमध्ये कमतरता निर्माण झाली असून महिला गृहोद्योगांची गणितंदेखील अवकाळी पावसामुळे यंदा चुकल्यामुळे लाडक्या बहिणींच्या या महिला गृहोद्योगांना राज्यसरकारने साथ देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांची निर्मिती मोठया संख्येने झाली असून अनेक महिला बचतगटांमार्फत सुरू असलेल्या महिला गृहोद्योगांना सूक्ष्म कर्ज, लघू कर्ज आणि मध्यम कर्जांचे वाटपदेखील करण्यात आले आहे. अनेक महिला बचत गटांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तसेच एचडीएफसी बँकेमार्फत प्रस्ताव करून पोलादपूर तालुक्यात सूक्ष्म कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी अनेक महिला बचतगटांना ही कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तथाकथित समाजसेवकाने बचतगटातील आठपैकी सात महिलांची कर्जे हडपून एका महिलेच्या सूक्ष्म कर्जात बचतगटाचे रोजगार निर्मिती व सक्षमीकरणाचे काम सुरू ठेवण्याचे भोंगळ मार्गदर्शन करताना पहिल्या कच्च्या मालाचा वापर होऊन तो संपण्यापूर्वीच पुढच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याची हमी देत हा कथित समाजसेवक गाशा गुंडाळून पसार झाला आहे. यामुळे महिलांची आर्थिक कोंडी होऊन त्यांनी त्यांचे अत्यल्प कर्जपुरवठयाचे गृहोद्योग सुरू ठेवले असतानाच ऐन उन्हाळयात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
मे महिन्याच्या कडकडीत उन्हांत उडीद दाळ, पोहे, कैऱ्या, करवंदं, आमरस, फणसाचे गरे, साबुदाणा आदी कच्चा माल मोठया प्रमाणात खरेदी करून पापड, कुरडया, लोणची, मिरगुंडं, फेण्या, फणसपोळया, आंबापोळया आदी वाळवणीच्या पदार्थांचे मोठया प्रमाणात उत्पादन करण्याचे आडाखे बांधणाऱ्या महिला गृहोद्योगांचे आर्थिक गणित 9 मे पासून बरसण्यास सुरूवात झालेल्या अवकाळी पावसाने पूर्णपणे बिघडवले आहे. सूक्ष्म कर्जदार महिलांना या कर्जांची परतफेड करण्याचेही आर्थिक बळ न राहिल्याने राज्यसरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने कोकणातील उद्यमशील लाडक्या बहिणीच्या यंदा झालेल्या आर्थिक ओढा-ताणीकडे गांभिर्याने लक्ष देऊन गृहोद्योगामुळे आर्थिक फटका बसलेल्या महिलांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी होत आहे.
महाड तालुक्यातील नाते येथील देवळेकरबंधू गृहोद्योगाच्या संचालिका अस्मिता देवळेकर यांनी, लाडक्या बहिणींनी त्यांच्या सानुग्रह अनुदानाद्वारे घरच्याघरी उद्योगनिर्मिती केली आणि पावसाने या लाडक्या बहिणींवर वक्रदृष्टी केल्यामुळे हे गृहोद्योग अवकाळी पावसामुळेच यंदा नुकसानीत गेले असल्याचे सांगितले असून बँकांची सूक्ष्म कर्ज फेडून बँका वाचविता येतील मात्र, संसार वाचविण्यासाठी महिलांचे गृहोद्योग वाचविले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा करून महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत महिला गृहोद्योगांना आर्थिक अनुदान देऊन यंदा अवकाळीच्या संकटातून तारण्याची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.