(मुंबई / वार्ताहर)
मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या STAGE OTT या व्यासपीठाने नव्या आणि होतकरू क्रिएटर्सना संधी देण्याचा पुढाकार घेतला आहे. आरा मल्टिमीडियाची निर्मिती असलेली ‘प्रेमायण’ ही वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, याच निर्मिती संस्थेच्या ‘प्लस मायनस २’ या नव्या वेबसिरीजचीही घोषणा करण्यात आली आहे. ही सीरिज ३० ऑक्टोबरपासून STAGE OTT वर प्रदर्शित होणार आहे.
‘प्रेमायण’चे दिग्दर्शन राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सत्यघटनेवर आधारित असलेल्या या प्रेमकथेतून नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, प्रेम, प्रतिष्ठा आणि सूड यांचे वेगळे कथाविश्व उलगडण्यात आले आहे. नितीन शिर्के आणि भीमराव मुडे यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे.
‘प्रेमायण’च्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत STAGE OTT च्या भविष्यातील योजना, नव्या कलाकारांना आणि क्रिएटर्सना संधी देण्याची भूमिका तसेच वेबसिरीजच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मान्यवरांनी आपले विचार मांडले. ओटीटी क्षेत्रात नवनवीन व्यासपीठे उदयास येत असताना, प्रस्थापित नावांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना त्यांच्या कल्पना साकारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर STAGE OTT भर देत आहे.
याविषयी बोलताना STAGE OTT मराठीचे कंटेंट आणि कल्चर हेड तसेच ‘प्रेमायण’चे क्रिएटर राजेश पाठक म्हणाले, “आज अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांसमोर येत आहेत. अशा वेळी नव्या आणि होतकरू क्रिएटर्सना संधी देणं, त्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवणं आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळवून देणं, ही आमची भूमिका आहे. दर महिन्याला ५० चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.”
‘प्लस मायनस २’ या नव्या वेबसिरीजच्या घोषणेबाबतही त्यांनी माहिती दिली. या सीरिजमधून एका तरल प्रेमकथेचा भावस्पर्शी प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘प्रेमायण’चे क्रिएटर आणि दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी STAGE OTT कडून मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “राजेश पाठक सर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नव्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनामुळे ‘प्रेमायण’सारख्या वेगळ्या कलाकृतीशी जोडले जाण्याची संधी मिळाली. नव्या क्रिएटर्सना विश्वासाने संधी आणि त्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळालं, तर उत्तम कलाकृती नक्कीच घडू शकतात. संपूर्ण टीमला सोबत घेऊन प्रत्येकाच्या कौशल्याला वाव देत पुढे जाणं महत्त्वाचं आहे. अशा प्रयत्नांतूनच नवे कलाकार आणि क्रिएटर्स घडतील, असा मला विश्वास आहे.”
दिग्दर्शक राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी ‘प्रेमायण’च्या कथाविषयाविषयी आणि मांडणीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. “या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर एक वेगळा विषय आणि कथा मांडणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव आणि मानवी नात्यांमधील गुंतागुंत यांचं चित्रण करताना प्रत्येक पात्राला स्वतःची ओळख आणि भावनिक खोली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा वेगळा अनुभव प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले.
वेबसिरीजच्या संगीताविषयी बोलताना संगीतकार रोहन-रोहन यांनी कथानकातील भावभावना संगीताच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. “या वेबसिरीजच्या संगीताची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली, ही आमच्यासाठी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कथानकातील भावना, पात्रांमधील नातेसंबंध आणि प्रसंगांची तीव्रता संगीताच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गायक रोहन प्रधान, शैली बिडवाईकर आणि भूमी प्रधान यांनी यातील गाणी गायली आहेत. ‘प्रेमायण’च्या कथेला साजेसं आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं संगीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं हे काम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नव्या कलाकारांच्या आणि क्रिएटर्सच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेसह STAGE OTT ने ‘प्रेमायण’ आणि ‘प्लस मायनस २’च्या माध्यमातून मराठी कथाविश्वातील नव्या निर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


