(माणगाव / रायगड)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. शुभम उतेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मृत मुलीच्या गावातीलच असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईहून गावी आली होती
निधी राकेश उतेकर (वय 15) असे मृत मुलीचे नाव आहे. निधी ही आपल्या कुटुंबासह मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. ती सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत होती आणि नुकतीच नववी इयत्ता उत्तीर्ण झाली होती. उन्हाळी सुट्टीसाठी सुमारे आठ दिवसांपूर्वी ती आई-वडील आणि भावासह माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी येथे आली होती.
मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली अन् परतलीच नाही
सोमवार, 25 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली होती. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी गावात आणि परिसरात तिचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तिचा कोणताही मागमूस लागला नाही. निधीचे वडील राकेश उतेकर यांनी सांगितले की, “आम्ही तिला एवढ्या रात्री बाहेर जाऊ नकोस असे सांगितले होते. मात्र, ‘मी लांब नाही, इथेच आहे’ असे ती म्हणाली होती. रात्री 10 वाजता तिला बोलवण्यासाठी बाहेर गेलो तेव्हा ती कुठेच दिसली नाही.”
जंगल परिसरात सापडला मृतदेह
बुधवार, 27 मे रोजी घरोशीवाडी लगतच्या डोंगराळ आणि जंगल परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह निर्जन जंगल परिसरात आढळून आला होता. तिच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
4 पथके तयार; 24 तासांत आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस, फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपासासाठी चार विशेष पथके तयार करण्यात आली. माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी सांगितले की, “मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. शोधमोहीमेदरम्यान तिचा मृतदेह डोंगराळ भागात सापडला. त्यानंतर विविध पथकांना वेगवेगळे टास्क देण्यात आले. तपासाच्या आधारे अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात आली.”
या घटनेनंतर संपूर्ण माणगाव तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात आरोपी आणि मृत अल्पवयीन मुलगी एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वाद, एकतर्फी प्रेमप्रकरण किंवा अन्य कोणता हेतू होता का, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

