( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शहरालगतच्या मिरजोळे भागात गाजलेल्या २६ वर्षीय भक्ती मयेकर हत्याकांडातील संशयितांची पोलिस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपासाचा नवा टप्पा आता तुरुंगाच्या चार भिंतीतूनच पुढे सरकणार आहे.
या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्यांमध्ये भक्तीचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (२५, रा. वाटद-खंडाळा), विश्वास विजय पवार (४१, रा. कळझोंडी) आणि सुशांत शांताराम नरळकर (४०, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा) यांचा समावेश आहे. पोलिस कोठडीत असलेल्या या आरोपींना 8 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी दोन दिवसांची अतिरिक्त कोठडी मागितली होती. न्यायालयाने ती मंजूर करून ११ सप्टेंबर रोजी आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिला. त्यामुळे आता मुख्य आरोपी दुर्वास पाटील याच्यासह त्याच्या दोन साथीदारांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने या प्रकरणातील तपासाचे चक्र नव्या वळणावर आले आहे.
दरम्यान, भक्ती मयेकर हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली होती. राकेश जंगम खूनप्रकरणातील आरोपी निलेश भिंगार्डे याला अलीकडेच जयगड पोलिसांनी अटक केली होती. तपासादरम्यान दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांनी निलेशच्या मदतीने ६ जून २०२४ रोजी राकेशचा खून केल्याची कबुली दिल्याचे समोर आले. त्यानंतर सांगली येथून निलेशला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, लवकरच भक्ती मयेकर हत्याकांडातील आरोपी दुर्वास पाटील व विश्वास पवार यांना राकेश जंगम आणि कळझोंडी येथील सीताराम वीर यांच्या खुनाच्या प्रकरणातही अटक करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. अद्याप अटक प्रक्रियेची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ही अटक नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

