(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुन्हेगारी नियंत्रणासोबतच तपास प्रक्रियेतही उल्लेखनीय परिणाम साधत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यातील कार्यक्षम पोलीस यंत्रणांमध्ये आपली ठळक छाप उमटवली आहे. गुणवत्तापूर्ण, जलद आणि परिणामकारक तपासाच्या जोरावर जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटवण्यात पोलिसांना यश आले असून, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आढाव्यात ही बाब अधोरेखित झाली आहे.
३१ मार्च २०२५ ते १ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासात रत्नागिरी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भाग १ ते ५ अंतर्गत दाखल झालेल्या एकूण १ हजार ७७७ गुन्ह्यांपैकी तब्बल ९२.३५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. केवळ १३६ गुन्हे प्रलंबित असून, हे प्रमाण अवघे ७.६५ टक्के इतके राहिले आहे. तसेच भाग ६ अंतर्गत, विशेषतः दारूबंदीशी संबंधित गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एकूण २ हजार ५५२ गुन्ह्यांपैकी तब्बल ९६.७५ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. या विभागातील फक्त ८३ गुन्हे प्रलंबित असून, प्रलंबितांचे प्रमाण केवळ ३.२५ टक्क्यांवर आले आहे. गुन्ह्यांच्या तपासातील ही प्रभावी कामगिरी पोलीस दलाच्या काटेकोर नियोजनाची, तपासातील सुसूत्रतेची आणि सातत्यपूर्ण देखरेखीची साक्ष देणारी मानली जात आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तपास प्रक्रियेवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवत वेळोवेळी आढावा घेतला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी अत्यंत वेगवान, सखोल आणि पुराव्याधारित तपास करत अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली. जिल्हा पोलीस दलाची ही कामगिरी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून, नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणारी ठरत आहे. वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी दाखवलेली ही कार्यक्षमता निश्चितच उल्लेखनीय मानली जात आहे.

