(रत्नागिरी)
रत्नागिरी नगरपरिषदेच्या हद्दीत अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अद्ययावत न केल्याने एकूण १७४ इमारती, संस्था आणि व्यावसायिक संकुलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गारवे तसेच अग्निशमन पर्यवेक्षक महेश साळवी यांनी दिले आहेत.
धोकादायक २९ निवासी इमारती
टाऊन प्लॅनिंगच्या नियोजनाविरोधात उभारलेल्या अनेक इमारतींमध्ये आवश्यक सुरक्षाव्यवस्था नाहीत. विशेषतः १२ ते १४ मजली इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य असतानाही नगरपरिषद हद्दीतील २९ निवासी इमारतींमध्ये ही साधनं बसवलेली नाहीत. त्यामुळे या इमारती धोकादायक ठरत असल्याचे विभागाचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
व्यावसायिक संकुल, शाळा, हॉस्पिटल मध्येही नियमभंग
शहरातील इतर ठिकाणीही अग्निसुरक्षेची गंभीर बाब समोर आली आहे. यात ४६ व्यापारी संकुल, २३ हॉटेल व लॉज, १३ सभागृहे, १८ शाळा व महाविद्यालये, ७ पेट्रोल पंप, १९ मॉल्स व १८ हॉस्पिटल्स यांचा समावेश असून सर्वांनी शासन नियमांनुसार अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे.
वारंवार नोटिसा, तरीही दुर्लक्ष
अग्निशमन विभाग दर सहा महिन्यांनी तपासणी करून संबंधितांना नोटिसा देतो. काहींना वारंवार सूचना देऊनही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. परवानाधारक इमारतींनाही महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक उंच इमारतीत व महत्त्वाच्या आस्थापनांत अग्निशमन यंत्रणा कार्यरत ठेवणे बंधनकारक असून याकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे नाही, त्या विरोधात कारवाई करण्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

