(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जि. प. कळझोंडी धरण व साठवण पाणी टाकी(शांती सागर जल कुंभ)ला जिल्हा परिषद सदस्या सौ.उषा सावंत, माजी सभापती व पंचायत समिती सदस्या अनुष्का खेडेकर, उपतालुकाप्रमुख अभयजी खेडेकर यांनी तातडीने भेट देऊन” दूषित पाणी पुरवठयामुळे आरोग्य धोक्यात” कळझोंडी धरणाबाबत खंडाळा वनयेथील उद्योजक प्रभाकर तथा काका मुळ्येंनी आंदोलनाचा इशारा दिला होता” असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी तातडीने पाहणी केली. यासंदर्भात रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी वाटद जिल्हा परिषद गटातील आपल्या प्रमुख लोकप्रतिनिधींना तातडीच्या सूचना देऊन कळझोंडी धरणाची पाहणी करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही हाती घेण्याचे आदेश दिले होते.
याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते प्रसाद उर्फ बाबुशेठ पाटील, विभाग प्रमुख बाबयशेठ कल्याणकर, कळझोंडी गावचे प्रशासक दीप्ती वीर, ग्रामसेवक अमोल केदारी, गावातील सामाजिक कार्यकर्ते व कळझोंडी गावचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार, आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक पर्शुराम निवेंडकर, आरोग्य सेवक सुरेश अंबुरे,नळपाणी पुरवठा योजना सुपरवाझर दत्ताराम निंबरे, कर्मचारी सहदेव वीर, संगम पवार, नितीन पवार, प्रशांत पवार, किशोर पवार, सैतवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश सावंत, टाकी बांधकाम विभागाचे ठेकेदार श्री खेतले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक विविध वृत्तपत्रांमध्ये कळझोंडी धरणातील “दूषित व दुर्गंधी पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याला धोका” या शीर्षकाखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदयजी सामंत यांच्या आदेशान्वये कळझोंडी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्या अनुष्का खेडेकर, जि. प. सदस्या उषा सावंत, शिवसेना उपतालुका प्रमुख आगरनरळ गावचे माजी सरपंच व प्रशासक अभयजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील विविध मान्यवर यांनी कळझोंडी धरणाला तातडीने भेट देऊन पाहणी केली.
सदर धरणातून होणा-या गढूळ व दुषित पाणीपुरवठ्याबाबत उपस्थित मान्यवरांनी तीव्र खंत व्यक्त केली. तसेच कळझोंडी धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये अनेक झाडी झुडपी, मोठी झाडे पाला- पाचोळा कुजून पाण्यात पडल्यामुळे पाणी दूषित होऊ शकते. याबाबतही नाराजी व्यक्त केली. जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना साठवण टाक्या (शांतीसागर जलकुंभ) व नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याची साठवण टाकी, फिल्टर टाकी यांना भेट देऊन येथील परिसरात जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा याबाबत संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधून तातडीने सुधारणा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. कळझोंडी धरण त्याचबरोबर साठवण पाणी टाकी यातील पाणी नमुना तपासण्यासाठी आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक पर्शराम निवेंडकर, आरोग्य सेवक सुरेश अंबुरे यांनी नेले असून लवकरच याबाबत रिपोर्ट सादर केला जाईल याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
उद्योजक प्रभाकर तथा काका मुळ्येंनी कळझोंडी धरणातून दुषित पाणीपुरवठ्याबाबत आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळे शासन प्रशासन खडबडून जागे झाले. एवढेच नव्हे तर कळझोंडी येथे असलेल्या ६ लाख लिटर पाण्याची टाकी व एक लाख लिटर पाण्याच्या दोन ही टाक्या कंत्राटी कर्मचारी यांच्याकडून स्वच्छ धुवून घेण्यात आल्या आहेत. आता तरी पाणी पुरवठा स्वच्छ होतो का हे पहावे लागणार आहे. कळझोंडी धरणातील पाणी थेट पंप हाऊस येथे सोडण्यात येत असल्याने व पंप हाऊसच्या विहीरीला नैसर्गिक झरे नसल्याने हा पाणी पुरवठा गढूळ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे.

