(राजापूर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
राजापूर-कोल्हापूर राज्यमार्गावरील अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील धोकादायक वळणावर ट्रक आणि बुलेट मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. नीलेश विलास पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, जोतिराम नामदेव रावण आणि संदीप दादासो पाटील (तिघेही रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरहून चिरा भरून प्रवीण राजाराम पाटील (रा. माजनाळ, ता. पन्हाळा) यांच्या मालकीचा ट्रक (एमएच 09 जे 4445) कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी कोल्हापूरहून पाचलकडे जाणारी बुलेट मोटारसायकल (एमएच 09 ओजे 6008) अणुस्कुरा घाटातील धोकादायक वळणावर आली असता दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, बुलेटस्वार नीलेश पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, निलेश पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर मदतीसाठी विव्हळत पडले होते. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या अपघातानंतर जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. अपघात घडून तब्बल एक ते दीड तास उलटूनही घटनास्थळी शासकीय रुग्णवाहिका दाखल झाली नाही. नागरिकांनी वारंवार संपर्क साधूनही ‘रुग्णवाहिकेत डिझेल नाही’ तसेच ‘डॉक्टर उपलब्ध नाहीत’ अशी धक्कादायक कारणे देण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
रुग्णवाहिका वेळेत न आल्याने स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेत जखमींना खासगी वाहनांतून उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली. जीव मुठीत धरून जखमी उपचाराची प्रतीक्षा करत असताना प्रशासन मात्र निष्क्रिय राहिल्याची भावना उपस्थित नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आपत्कालीन सेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच दुर्गम घाट परिसरात सक्षम आणि तत्पर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
नीलेश पाटील यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून, त्यांच्या निधनाने वाघुर्डे गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. या प्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस अधिकारी गोरक्षनाथ माळी करत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून आपत्कालीन सेवा कशासाठी?
अपघातानंतर तब्बल दीड तास रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलीच नाही. नागरिकांनी वारंवार संपर्क साधल्यानंतर “गाडीत डिझेल नाही”, “डॉक्टर उपलब्ध नाहीत” अशी कारणे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा केवळ निष्काळजीपणा नसून थेट जनतेच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून आपत्कालीन सेवा उभी करते नेमकी कशासाठी? अपघातग्रस्त रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना त्यांना वेळेत मदत मिळाली नाही, तर अशा व्यवस्थेचा उपयोग तरी काय? दुर्गम भागातील नागरिकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का, की त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेत डिझेलसुद्धा उपलब्ध नसावे? “108 सेवा” ही फक्त जाहिराती, बॅनर आणि सरकारी दाव्यांपुरतीच मर्यादित राहिली आहे का? आपत्कालीन परिस्थितीत जर नागरिकांनाच स्वतःच्या वाहनांतून जखमींना उचलून न्यावे लागत असेल, तर प्रशासनाच्या यंत्रणांचा नेमका उपयोग कोणासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

