(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा येथून पालीच्या दिशेने जाणाऱ्या लोखंडी प्लेटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा कापडगाव येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला. उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकाला धडकून तोडत पलटी झाला. अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकून पडल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ASI कमलाकर तळेकर, कॉन्स्टेबल नागेश खामकर आणि होमगार्ड सूरज सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेत मदतकार्य सुरू केले. चालक केबिनमध्ये अडकल्याचे लक्षात येताच तातडीने MIDC अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. MIDC अग्निशामक दलाचे उप अग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक यंत्रचालक राकेश बाबर, अग्निशमन विमोचक प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे, अजय साळुंखे तसेच अग्निशमन कर्मचारी कुणाल पाटील, अंकित पाटील आणि संकेत कुंभार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पथकाला यश आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर घटनास्थळी उपलब्ध असलेल्या जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक काहीसा बाजूला सरकविण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या दुर्घटनेमुळे कापडगावच्या उतारावरील अवघड वळण आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच दुभाजक व रस्त्याच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.



