(संगमेश्वर / एजाज पटेल)
त्याग, समर्पण आणि अढळ ईश्वरभक्तीचे प्रतीक मानला जाणारा पवित्र ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदचा सण संगमेश्वर येथील मापारी मोहल्ला जामा मशिदीत अत्यंत भक्तीमय, शांततापूर्ण आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण मशिद परिसरात श्रद्धा, प्रार्थना आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी ठीक आठ वाजता विशेष सामूहिक नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीचे मुख्य इमाम हजरत मौलाना मनजूर आलम यांच्या नेतृत्वाखाली मापारी मोहल्ला तसेच परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने नमाज पठण केले. नमाजानंतर मौलाना मनजूर आलम यांनी मंबरवरून मार्गदर्शक खुत्बा देत हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि हजरत इस्माईल अलैहिस्सलाम यांच्या त्यागाची आणि ईश्वरनिष्ठेची प्रेरणादायी कथा उपस्थितांसमोर उलगडून सांगितली.
कुर्बानीचे धार्मिक, सामाजिक आणि मानवी मूल्य स्पष्ट करताना त्यांनी मानवतेचा, परोपकाराचा आणि आपसी सलोख्याचा संदेश दिला. त्यानंतर देशात सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी तसेच सर्व धर्मीयांमध्ये बंधुभाव अधिक दृढ व्हावा यासाठी विशेष सामूहिक दुआ करण्यात आली.
प्रार्थना संपल्यानंतर मशिदीच्या आवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रेम, एकता आणि बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले. यानंतर मौलाना मनजूर आलम यांनी आपल्या भावपूर्ण आवाजात जगप्रसिद्ध नातिया कलाम “मुस्तफा जाने रहमत पे लाखो सलाम…” सादर केले. त्यांच्या सुरेल पठणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भाविकांनी अत्यंत आदरपूर्वक उभे राहून सलातो-सलामी अर्पण केली. या प्रसंगी अनेकांच्या डोळ्यांत भक्तिभावाचे अश्रू तरळले.
या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन जमातचे अध्यक्ष रऊफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटी सदस्यांनी केले होते. सण शांततेत आणि उत्साहात पार पडल्याबद्दल अध्यक्ष रऊफ खान यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या इतर धर्मीय बांधवांचेही विशेष आभार मानले.

