(संगमेश्वर / एजाज पटेल)
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात संगमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पारेख पेट्रोल पंपासमोर संशयास्पद अवस्थेत उभी असलेल्या वॅगनर कारमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
संगमेश्वर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, पारेख पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या साईडपट्टीवर उभी असलेल्या एका कारमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २६ मे २०२६ रोजी रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
तपासादरम्यान पोलिसांना एमएच १४ बीके ४१२० क्रमांकाची लॉक अवस्थेतील वॅगनर कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. प्राथमिक तपासात या वाहनातून विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी कार घटनास्थळीच सोडून फरार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत तपासणी
घटनास्थळी संशयास्पद वाहन आढळल्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभाग, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर २७ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली.
या तपासणीत कारमधून केशरयुक्त विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, प्रिमियम आरएमडी पान मसाला आणि एम सेंटेड टोबॅको गोल्ड यांसारखे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची किंमत २ लाख ४६ हजार ६०० रुपये असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ३ लाख रुपये किमतीची वॅगनर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. एकूण ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फरार आरोपीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा
या कारवाईप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृणाल चिंतामणी घोलप यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच भारतीय दंड विधान कलम ३२८, १८८, २७२, २७३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

