( संगमेश्वर / प्रतिनिधी )
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक / प्राध्यापक परिषदेच्या वतीने दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी येथे ‘शिक्षण व्यवस्थेतील समस्या व उपाय’ या विषयावर राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथील भूगोल विभाग प्रमुख प्रो. डॉ. नितीन देशमुख यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्य सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात सैनिक कल्याण फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या विशेष सन्मानानंतर विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशनरावजी बेंडकुळे, उपाध्यक्ष श्री विजयकुमार देशमुख, उपाध्यक्ष श्री युवराज पाटील, सचिव ॲडव्होकेट पी. डी. कदम, सहसचिव वसंतराव फड, सहसचिव सुरेशराव देशमुख व कोषाध्यक्ष श्री रामचंद्र शेळके यांच्यासह मंडळातील सर्व सदस्यांनी डॉ. देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.तसेच महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला. या सन्मानामुळे अहमदपूरच्या शैक्षणिक क्षेत्राला नवचैतन्य मिळाले असून, डॉ. नितीन देशमुख यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

