(मुंबई)
नाशिकमधील चर्चित अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘Maharashtra Epstein Files’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणातील विविध पैलूंवर भाष्य करणारा हा सिनेमा अद्याप शूटिंगपूर्व टप्प्यात असतानाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्यासारखे पात्र अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा दावा दीपाली सय्यद यांनी केला आहे.
“हा सिनेमा करू नकोस” म्हणत धमक्या?
दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मला अनेक कॉल येत आहेत. ‘तू हा सिनेमा करू नकोस’, ‘ते पात्र साकारू नकोस’, ‘थोडं थांब’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.” त्या पुढे म्हणाल्या की, काही महिला नेत्यांनीदेखील त्यांना फोन करून “ते तुझं राजकीय करिअर बरबाद करतील” असा इशारा दिला आहे.
“कर नाही तर डर कशाला!”
धमक्यांनंतरही आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट करत दीपाली सय्यद यांनी “कर नाही तर डर कशाला!” असे म्हणत संबंधितांना थेट आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या, “मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहे. मला कोणकोणाचे फोन आले आणि काय धमक्या दिल्या गेल्या, याची माहिती त्यांना देणार आहे.”
“मी कलाकार आहे, कुणाच्या परवानगीने काम करत नाही”
या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबत दीपाली सय्यद यांनी अद्याप स्पष्ट खुलासा केलेला नाही. मात्र त्या म्हणाल्या, “मी कलाकार आहे. मी कुणाच्या परवानगीने काम करत नाही. कालच माझ्या हातात या सिनेमाची स्क्रिप्ट आली आहे. मी कोणती भूमिका करणार आहे, हे योग्य वेळी समोर येईल.”
Motion Poster Launch नंतर चर्चांना उधाण
दरम्यान, ‘Maharashtra Epstein Files’ या चित्रपटाचा Motion Poster नुकताच लॉन्च करण्यात आला असून त्यानंतर या सिनेमाविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाच्या कथानकात नेमके कोणते राजकीय आणि सामाजिक संदर्भ असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

