( पोलादपूर/ शैलेश पालकर )
Mumbai-Goa Highway वर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर झालेल्या भीषण अपघातात स्कूटरस्वार वार्डबॉय गंभीर जखमी झाला आहे. भरधाव कारने स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. किरण गौतम बाविस्कर (वय 22) असे जखमी वार्डबॉयचे नाव असून तो एक्टिवा स्कूटर (एमएच 08 बीजे 9724) वरून पोलादपूरच्या दिशेने कामानिमित्त जात होता. त्यावेळी मुंबईकडून महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा मरांझो कारने (जीजे 29 टी 7076) त्याच्या स्कूटरला मागून धडक दिली. कार चालक हर्ष दिनेशकुमार पटेल (वय 21) याने अतिवेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या भीषण धडकेत किरण बाविस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना महाड येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाणे आणि कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, पोलीस हवालदार राजन माजलकर आणि कृष्णा चौधरी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

