(हैदराबाद)
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच वादात अडकलेला “द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड” सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली असतानाच, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे. मात्र हे प्रमाणपत्र मिळण्याआधी निर्मात्यांना तब्बल 16 मोठे कट आणि बदल करावे लागले असल्याचे समोर आले आहे.
किस आणि बलात्कार दृश्यांवर कात्री
मीडिया रिपोर्टनुसार, सीबीएफसीने चित्रपटातील काही संवेदनशील दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल सुचवले. त्यानुसार,
- किस आणि बलात्काराशी संबंधित दृश्ये सुमारे 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली
- एक लिप-लॉक दृश्य 7 सेकंदांनी कमी करण्यास सांगण्यात आले
- बलात्काराचे दृश्य 20 सेकंदांनी कमी करण्यात आले
- एका महिलेला थप्पड मारण्याचे दृश्य आणि दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर मारण्याचे दृश्य प्रत्येकी 2 सेकंदांनी कमी करण्यात आले
बुलडोझर दृश्य, संवाद आणि शब्दांमध्ये बदल
चित्रपटातील आरोपीचे घर बुलडोझरने पाडल्याचा एक दृश्य बदलण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, तीन संवाद बदलण्यास आणि एका शब्दाला म्यूट करण्यास सीबीएफसीने स्पष्ट सूचना दिल्या.
डिस्क्लेमरवर विशेष भर
चित्रपट ‘सत्य घटनांवर आधारित’ असल्याचा दावा करत असल्याने, सीबीएफसीने निर्मात्यांना याबाबत स्पष्ट आणि विस्तृत डिस्क्लेमर जोडण्यास सांगितले. हा डिस्क्लेमर 2 मिनिटे 3 सेकंदांनी वाढवण्यास आणि त्यामध्ये व्हॉइस-ओव्हर समाविष्ट करण्यास सूचना देण्यात आली.
याशिवाय, संवादांसह संपूर्ण पटकथा सादर करण्याचे, कथा खऱ्या घटनांवर आधारित असल्याचे सिद्ध करणारी सहाय्यक कागदपत्रे देण्याचे आणि एका अल्पवयीन कलाकाराच्या कास्टिंगसाठी कंसेंट लेटर सादर करण्याचे निर्देशही बोर्डाकडून देण्यात आले होते. हे सर्व बदल आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर चित्रपटाला अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. चित्रपटाचा अंतिम रनटाइम 131 मिनिटे 24 सेकंद म्हणजेच 2 तास 11 मिनिटे 24 सेकंद इतका आहे.
27 फेब्रुवारीला प्रदर्शन
दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखालील ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ हा चित्रपट आता 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटावरून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया आणि वाद अद्यापही सुरूच आहेत.

