(लातूर)
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन अधिकच गडद होत असून केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) गेल्या १५ दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून कसून तपास करत आहे. या तपासादरम्यान डॉक्टर, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस चालक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचलेल्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे समोर येत आहेत.
सीबीआयच्या तपासात लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांनी प्रा. प्रल्हाद कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका विकत घेत ती पुढे प्रा. शिवराज मोटेगावकर यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मोटेगावकर यांनी ही प्रश्नपत्रिका इतर विद्यार्थ्यांना विकल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
“१० दिवस आधीच पेपर हातात दिला” माफीचा साक्षीदार करण्याची प्रक्रिया
या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाने सीबीआय चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. “नीट परीक्षा होण्याच्या तब्बल १० दिवस आधी वडिलांनी माझ्या हातात प्रश्नपत्रिका दिली होती,” अशी कबुली त्याने दिल्याचे सूत्रांकडून समजते. या प्रकरणात त्याला माफीचा साक्षीदार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
५ डॉक्टर, विद्यार्थी आणि पालकांची चौकशी
सीबीआयने आतापर्यंत लातूरमधील ५ डॉक्टरांची चौकशी केली असून अनेक विद्यार्थी आणि पालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्ड डिस्क, संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यातून डॉक्टर आणि प्राध्यापक अटकेत
या प्रकरणात पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक तेजस शाह आणि लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली आहे. तेजस शाह याला आरोपी मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा फुटलेला पेपर मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये तेजस शाह यांचा नंबर “गॉड” नावाने सेव्ह असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या अटकेनंतर NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.
लातूरमधील कोचिंग नेटवर्क तपासाच्या केंद्रस्थानी
सीबीआयचे विशेष लक्ष सध्या लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या नेटवर्कवर आहे. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचे समोर आले आहे. सीबीआयने देशभरातील दिल्ली, पुणे, नाशिक, जयपूर, गुरुग्राम, लातूर आणि अहिल्यानगरसह ४९ ठिकाणी छापे टाकले असून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
मोटेगावकर यांच्या इमारतीवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या लातूर तालुक्यातील खोपेगाव शिवारातील कोट्यवधींच्या इमारतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही इमारत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रशासन पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता
सीबीआयकडून या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा सखोल तपास सुरू असून आणखी काही नामांकित डॉक्टर, कोचिंग क्लासेस चालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

