(अमरावती / वृत्तसंस्था)
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीने गेली २० वर्षे आयोजित करण्यात येणारी विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी स्पर्धा यंदा रद्द करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेऐवजी केवळ बालगोपाळांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून साध्या पद्धतीने परंपरा कायम ठेवली जाणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली.
रुग्णालयातील दुर्घटनेनंतर अमरावती शहरासह जिल्ह्यात शोकाकुल वातावरण असल्याने यंदा नेहमीप्रमाणे जल्लोषात उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, असे रवी राणा यांनी सांगितले. दहीहंडी स्पर्धेसाठी होणारा सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च विविध गरजू आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा रवी राणा यांनी केली. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे सांगत त्यांनी संबंधित कुटुंबीयांच्या घरी जाऊन मदत देण्याची घोषणा केली. पूजा स्वप्निल बोरंगे या रोजंदारीवर काम करतात, गायत्री प्रफुल चोपडे यांच्या पतीची खासगी नोकरी आहे, तर किरण गंगाराम बेठेकर या शेतमजुरी करतात. या तिन्ही महिलांनी आपले बाळ गमावले असून त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचा हा प्रयत्न असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
आगीतून बचावलेल्या ३६ बालकांच्या नातेवाईकांनाही प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना स्वयंरोजगाराचा आधार देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्णबधिर, अंध किंवा अपंगत्वासह जन्मलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. याशिवाय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही याच निधीतून आर्थिक मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रवी राणा यांनी सांगितले. अमरावतीसह परतवाडा, धारणी, अंजनगाव सुर्जी आणि तिवसा येथील नियोजित दहीहंडी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीतील जल्लोष, रोषणाई आणि मनोरंजनाला यंदा फाटा देण्यात येणार आहे. ६ सप्टेंबर रोजी कोणताही गाजावाजा न करता केवळ बालगोपाळांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून ती फोडण्यात येणार आहे. उत्सवाची परंपरा कायम ठेवत यंदा त्याला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देण्यात आली आहे.

