(ठाणे)
डोंबिवली येथील एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका नामांकित खासगी रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित डॉक्टरने मद्यप्राशन करून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या. वेळेवर मदत मिळाल्याने डॉक्टरांचे प्राण वाचले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या हॉस्पिटलमधील नर्सने बोलणे बंद केल्याच्या नैराश्यातून या डॉक्टरने 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या घेऊन जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.
नर्ससोबतच्या नात्यातील तणावातून टोकाचा निर्णय
पोलिस सूत्रांनुसार, या डॉक्टरचे त्यांच्याच रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. या नात्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून ते संयुक्तपणे रुग्णालय चालवतात. कौटुंबिक वाद वाढल्यानंतर डॉक्टर काही काळापासून डोंबिवली पूर्वेकडील एका उच्चभ्रू सोसायटीत वेगळे राहत होते.
दरम्यान, नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावला होता. डॉक्टरने सांगितले की, माझे लग्न झाले आहे. तुझ्याशी लग्न कसे काय करु शकतो. नर्सकडून वारंवार लग्नाबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर तिने बोलणे बंद केल्याने डॉक्टर मानसिक तणावात गेले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कर्मचारी वेळेवर पोहोचल्याने जीव वाचला
डॉक्टर नियमितपणे रुग्णालयात न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनला प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचारी थेट त्यांच्या घरी गेले. दरवाजा उघडल्यानंतर डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही घटना विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित सर्व बाजू तपासल्या जात आहेत. सध्या कोणतीही गुन्हेगारी नोंद झालेली नसून तपास प्राथमिक टप्प्यात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.

