(छत्रपती संभाजीनगर)
शहरातील एका १५ वर्षीय शाळकरी मुलीच्या डोक्यावर केस उगवत नसल्याने व कायम टक्कल पडत असल्यामुळे उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या. वैद्यकीय तपासणीत तिच्या पोटात केसांचा गोळा आढळून आला. यानंतर मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तिचे ‘ट्रायकोफेगिया’ नावाच्या मानसिक आजारावर निदान झाले – जी स्वतःचे केस उपटून खाण्याची एक विकृती आहे.
ही मुलगी दीड वर्षांपासून टक्कल पडण्याच्या समस्येने त्रस्त होती. पालकांनी तिला त्वचारोग तज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरू केले. मात्र काही काळानंतर तिचे पोट फुगू लागले आणि वेदना वाढल्या. रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटात केसांचा मोठा गोळा आढळून आला. यामुळे तिच्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.
‘ट्रायकोफेगिया’ म्हणजे काय?
‘ट्रायकोटिलोमेनिया’ (Trichotillomania) हा एक मानसिक आजार असून यात व्यक्तीला स्वतःचे केस उपटण्याची अनिवार इच्छा होते. काही रुग्ण या केसांना चावतात, गिळतात किंवा फेकून देतात. हे वर्तन अनेकदा अनावधानाने आणि मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्यामुळे घडते. यालाच ‘ट्रायकोफेगिया’ म्हणतात – ज्यात केस खाल्ले जातात, आणि त्यामुळे पोटात केसांचा गोळा तयार होतो.
मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, “ही मुलगी काही काळ मानसिक तणावात होती. तिच्या कृतीमुळे तिला ‘ट्रायकोफेगिया’ झाल्याचे निदान झाले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोटातील केसांचा गोळा काढण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे. ट्रायकोटिलोमेनिया हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह स्पेक्ट्रम disorders चा एक भाग आहे. या विकारामुळे रुग्ण सतत केस उपटण्याकडे वळतो, यानंतर त्याला काहीसा आराम किंवा आनंद मिळतो. हा त्रास दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारा असतो, त्यामुळे तज्ज्ञांमार्फत समुपदेशन आणि वर्तनात्मक उपचार (CBT) करणे अत्यावश्यक असते.”
रुग्णांना आधाराची गरज:
या विकाराने ग्रस्त व्यक्तींमध्ये लाज, अपराधीपणा आणि नैराश्याची भावना दिसून येते. अनेकजण आपले टक्कल लपवण्यासाठी सामाजिक प्रसंग टाळतात. यासाठी रुग्णांना समजून घेणे, त्यांच्या सवयी बदलण्यासाठी सकारात्मक प्रेरणा देणे गरजेचे असते. कुटुंबीयांचा आधार, मानसिक समुपदेशन आणि नियमित उपचार यामुळे सुधारणा शक्य आहे. रुग्ण किंवा पालकांनी लक्षणे दिसताच त्वचारोग तज्ज्ञांव्यतिरिक्त मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतो, असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे.