( नवी मुंबई )
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तीन तुकडे करून ते गवळी देव हिल परिसरातील जंगलात नेऊन पुरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण गुन्हा तब्बल ११ महिने समजून आला नव्हता, मात्र बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश केला.
या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पत्नी सुनीता कुशवाह (वय ४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (वय ३०) यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी दिली.
ऐरोलीतील यादवनगरमध्ये घडली घटना
हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव बळीराम सूर्यनाथ कुशवाह (वय ५०) असे आहे. बळीराम हे पत्नी सुनीता आणि दोन मुलांसह ऐरोलीतील यादवनगर येथे राहत होते. ९ ऑगस्ट २०२५ रोजी ते अचानक बेपत्ता झाल्याचे सर्वांना सांगण्यात आले होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, पती बेपत्ता झाल्यानंतरही पत्नीने अनेक महिने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली नव्हती. याच संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांचे लक्ष सुनीताकडे गेले. चौकशीदरम्यान ती वारंवार वेगवेगळी माहिती देत होती. शिवाय ती सतत राहण्याचा पत्ता बदलत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
अनैतिक संबंधातून हत्येचा कट
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुनीताच्या मोबाईल फोनची आणि कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडीआर) तपासणी केली. त्यातून तिचे घणसोली येथे राहणारा आणि व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या राहुल दशरथ प्रजापती याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचे स्पष्ट झाले. तपासात पुढे समोर आलेल्या माहितीनुसार, बळीराम यांना पत्नीच्या या संबंधांची माहिती मिळाली होती. त्यांनी पत्नीला राहुलसोबतचे संबंध तोडण्यास सांगितले होते. यामुळे दोघांच्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याने सुनीता आणि राहुल यांनी बळीराम यांची हत्या करण्याचा कट रचला.
मुलांना नातेवाईकांकडे पाठवून केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सुनीताने दोन्ही मुलांना जवळच्या नातेवाईकांकडे पाठवले. रात्री बळीराम झोपलेले असताना राहुल घरात आला. त्यानंतर दोघांनी मिळून बळीराम यांचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी अत्यंत क्रूरपणे मृतदेहाचे तीन तुकडे केले. शिर वेगळे केले आणि उर्वरित शरीराचे दोन भाग केले. त्यानंतर हे तिन्ही तुकडे बेडशीट आणि घरातील कपड्यांमध्ये गुंडाळून गोणीत भरले. मृतदेहाचे तुकडे राहुलच्या रिक्षामध्ये टाकून दोघांनी ते गवळी देव हिल परिसरातील निर्जन जंगलात नेले. तेथे खड्डा खोदून मृतदेहाचे तुकडे पुरण्यात आले. त्यानंतर दोघांनी हा गुन्हा पूर्णपणे लपवण्याचा प्रयत्न केला.
नातेवाईकांना सांगत राहिली, “पती घर सोडून गेला”
हत्येनंतर सुनीता सातत्याने नातेवाईकांना बळीराम घरातून निघून गेल्याचे सांगत राहिली. नंतर सुनीताने त्यांचे वडिलोपार्जित घर भाड्याने दिले आणि आपल्या मुलांसोबत नवी मुंबईतील घणसोली येथे राहायला गेली. त्यामुळे अनेक महिन्यांपर्यंत कोणालाही संशय आला नाही. आपले पकडले जाणे टाळण्यासाठी आरोपी वारंवार आपले फोन आणि सिम कार्ड बदलत असत. मात्र, कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) नुसार त्या दोघांमध्ये सतत संवाद सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. बळीराम यांचा भाऊ त्यांच्या मूळ गावाहून नवी मुंबईत आल्यानंतर त्याला संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद वाटला. सुनीता देत असलेल्या उत्तरांवर समाधान न झाल्याने त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बळीराम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
कॉल रेकॉर्डमुळे उघड झाले रहस्य
बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुनीताची सखोल चौकशी करण्यात आली. तिच्या जबाबात सातत्याने विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुरावे तपासले. त्यातून राहुलशी असलेले घनिष्ठ संबंध आणि संशयास्पद हालचाली स्पष्ट झाल्या. त्यानंतर दोघांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. अखेर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी हत्या करून मृतदेहाचे तुकडे जंगलात नेऊन पुरल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गवळी देवच्या घनदाट जंगलातून मृतदेहाचे काही अवशेष ताब्यात घेतले असून, शरीराच्या इतर भागांचा शोध सुरू आहे.
१० जुलैला गुन्हा दाखल, दोघांना अटक
या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी १० जुलै २०२६ रोजी सुनीता कुशवाह आणि राहुल प्रजापती यांच्याविरुद्ध हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (खून), 238 (पुरावा नष्ट करणे) आणि 3(5) (सामूहिक उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कल्पना जाधव करत आहेत.

