( दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी )
तालुक्यातील हर्णे गावात दोन तरुणांना ३० ते ४० जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने दापोली तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. “सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने मध्यरात्रीपर्यंत परिसरात तणाव कायम होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास हर्णे किल्ला परिसरात काही तरुण कथितरित्या अयोग्य कृत्य करत तसेच धूम्रपान करत असल्याचे चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्या निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी हा वाद अधिक चिघळल्याचे समोर आले. संबंधित तरुणांनी ३० ते ४० जणांचा जमाव गोळा करून चिन्मय गुरव व महेंद्र रघुवीर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून, एकावर दापोली येथे उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी केळसकर नाका परिसरात रास्ता रोको आंदोलन छेडत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा केली. दरम्यान, दापोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी सहा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आंदोलकांना दिली. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, उद्यापर्यंत सर्व आरोपींना अटक न झाल्यास मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर धडक देऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, उद्या २८ मे रोजी बकरी ईद सण असल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली आहे. दापोलीसह हर्णे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मंडणगड, खेड आणि रत्नागिरी येथून अतिरिक्त पोलिस फौज मागविण्यात आली आहे.

