(रत्नागिरी)
मस्कुलर डिट्रोफीचा आजार हा कधीही बरा होणारा नाही आणि यावर ठोस असे काहीही उपचार नाहीत. या आजाराने भाऊ बहिण ग्रस्त आहेत. त्या सौ. ज्योती गुरव आणि भाऊ या दोघांनाही भावाला मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या घरी सध्या कोणी कमावते व्यक्ती नसल्यामुळे आर्थिक अडचण आहे. याबाबत रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सौ. ज्योती योगेश गुरव (वय ३६ वर्ष. मु. पो. चिपळुण) यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाले असून बहिणींची लग्न झाली आहेत. ज्योती यांना वयाच्या १८ वर्षापासून पाठदुखी, जिना चढताना त्रास होणे, चालताना पायात कळा येणे, पाय दुखणे हा त्रास होऊ लागला. पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मणक्यात गॅप पडली असेल म्हणून हा त्रास होत असेल घरच्यांना वाटत होते. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले, टेलरिंग व पार्लरचा शासकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. काही वर्षे मोबाईलच्या दुकानातही नोकरी केली. त्यांचा विवाह योगेश गुरव यांच्याशी झाले. त्यांना शिवम हा मुलगा असून तो १४ वर्षाचा आहे.
ज्योती गुरव यांच्या अपंगत्वात हळुहळु वाढ होतच होती. एक दिवस किचन कट्ट्याला टेकून उभ्या असताना त्यांचा तोल जाऊन पडल्या आणि खुब्याला मार लागला. त्यानंतर त्यांना उभे राहता आले नाही. घरातली सर्व कामे बसून, गुडघ्यावर रांगत करत होत्या. हातातली ताकदही कमी कमी होत गेली. काहीही काम करायला जमेनासे झाले. त्यावेळी डॉक्टरांनी हा आजार मस्कुलर डिट्रोफीचा आहे असे निदान केले. हा आजार कधीही बरा होणारा नाही आणि यावर ठोस असे काहीही उपचार नाहीत.
खेडशी येथे ज्योती गुरव राहत असून त्यांची आई, भाऊ आणि मुलगा असे चौघेही राहतात. भाऊ ऋषिकेश मोहन नलावडे याला हा आजार अचानक झाला आहे. तो पूर्वी हॉटेल व्यवसाय करत होता, परंतु आजारपणामुळे त्याने हा व्यवसाय बंद केल आहे. आई घरी जेवण बनविते. दोन्ही मुलांची काळजी घेत आहे.
ज्योती यांचा मुलगा शुभम हा त्यांची सर्व मदत करतो. तो आईचं सगळं आवरुन झाल्यानंतर शाळेला जातो. तो इयत्ता आठवीत शिकत आहे. त्यांच्या घरी कोणीच कमावते नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरात दोन रुग्ण असल्याने दोघांनाही ने-आण करण्यासाठी व्हीलचेअरची गरज आहे. मुलाचे शिक्षण सुरू ठेवायचे आहे. खर्च वाढत चालला आहे आणि उत्पन्नाचे काहीच साधन नाही. दानशूर मंडळींनी मदतीसाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनशी (8329534979) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.