(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कोडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे आणि माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणी निपाणी पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील संशयित तरुणावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
बुरंबाड परिसरात कैदेत ठेवलेली १७ वर्षीय मुलगी बुधवारी दुपारी घरातून पळून बाहेर पडली. आरवलीकडे धावत जाणाऱ्या या मुलीला स्थानिक रिक्षाचालक इरफान खान यांची नजर पडली. त्यांनी तत्काळ मुलीला थांबवून चौकशी केली असता ती रडत रडत सांगू लागली की, तिला कुणीतरी पळवून आणले आहे. खान यांनी तातडीने माखजन पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्परतेने मुलीला ताब्यात घेत कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला.
चौकशीत या अल्पवयीन मुलीने धक्कादायक माहिती दिली. ती कर्नाटकातील आदर्शनगर, निपाणी, जि. बेळगाव येथील असून सध्या कागल येथील महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत असल्याचे तिने सांगितले. दिनांक २० सप्टेंबर रोजी कॉलेजला जाताना तिचा वर्गमित्र विघ्नेश संजय गुरव (रा. बुरंबाड, ता. संगमेश्वर) याने तिला हत्याराचा धाक दाखवून पंढरपूरला नेले. मोबाईल फोडून टाकला आणि सतत धमकावत ठेवले. त्यानंतर मुंबई, कराड असा प्रवास करत चार दिवसांपूर्वी तो तिला बुरंबाड येथील घरात घेऊन आला. यादरम्यान त्याने बळजबरी केल्याचा आरोप मुलीने केला.
आजी झोपल्याचा फायदा घेऊन पळून सुटका
१ ऑक्टोबर रोजी विघ्नेश व त्याची आई कोल्हापूरला गेले होते. त्या वेळी त्याची आजी घरात झोपली असताना मुलीने संधी साधून मागील दरवाजा उघडून पळ काढला. रस्त्यातच रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला.
निपाणी पोलिसांत गुन्हा दाखल
मुलीच्या मामाने आधीच निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा नोंद क्र. ९६/२०२५ प्रमाणे बी.एन.एस. १३७ (२) अन्वये गुन्हा नोंद आहे. माखजन पोलिसांनी निपाणी पोलिसांशी समन्वय साधून मुलगी त्यांच्या स्वाधीन केली. दरम्यान, अपहरण करणारा विघ्नेश गुरव याच्यावर कारवाई सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

