आज पक्षीय राजकारणामुळे गाव नव्हे तर वाडीची शकले झालेली आहेत. वरची वाडी, मधली वाडी, खालची वाडी, उगवत, मावळत, धारेची, कड्याची अशी नैसर्गिक सीमारेषा व राजीपुर्वी, गावकार अशी घराणी आधीपासून होती. पण पक्षीय राजकारण व त्यातून येणारा सत्तासंघर्ष यामुळे कोकणातील प्रत्येक गावातील वातावरण हे अतिशय कलुषित झालेले आहे. पूर्वीची गण्यागोविंदाने नांदणारी गावे आज कोर्टकचेरीचे उंबरठे झीजवताना दिसतात आणि यामुळे हजारोकोटींच्या शासकीय योजना असूनही कोकणातील गावे ही विकासापासून कोसो दूर राहिली आहेत. गावातील या दुफळीचा फायदा हे सर्व पक्षीय राजकारणी नेते मंडळी उचलत असून किंवा त्यांच्याच कृपाशीर्वादाने हे सुरू आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
याचाच पुढचा भाग म्हणजे वाडीची सार्वजनिक पूजा. या पूजेच्या निमित्ताने पंचक्रोशी मर्यादित किंवा निमंत्रीतांच्या कबड्डी स्पर्धा हे मोठे फॅड आहे. कारण वाडीतील हौशी उदयोन्मुख व महत्वकांक्षी तरुणांना चमकोगीरीची ही नामी संधी असते, गावातील सरपंच, शाखाप्रमुख ते आमदार महोदय आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून पैसे गोळा करायचे, मोठमोठी बॅनर स्वतःसहित नेत्यांचे फोटो आणि दोन तीन दिवस होणारा उदोउदो यामुळे नेते खुश, वाडीतील कार्यकर्ते खुश, व त्यामुळेच स्वस्त लोकप्रियतेची जत्रा ठिकठिकाणी भरवली जाते.आणि यामध्ये आपल्या अस्सल मराठमोळ्या खेळाचा कबड्डीचा मात्र र्हास होताना दिसतो, व एक कबड्डी प्रेमी म्हणून याचे वाईट वाटते. कारण प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डीपटूंना आलेले सोनेरी दिवस आपण पाहतो. त्यावेळी ज्या महाराष्ट्राने हा खेळ देशाला शिकवला त्या महाराष्ट्रातील व खास करुन कोकणातील कबड्डीपटू आज कुठे आहेत? हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. आणि याला कारण आपली कूपमंडूक वृत्ती.
पंचक्रोशी व निमंत्रितांच्या स्पर्धा भरवून आपल्याकडे प्रदीप नरवाल, नवीन कुमार, आशू मलिक, अर्जुन देशवाल, पवन शेरावत, विकास खंडोळा असे खेळाडू घडतील का? अनुप कुमार, अजय ठाकूर तर दूरच राहिले. त्यामुळे जागतिक दर्जाचे कबड्डीपट्टू निर्माण होण्यासाठी पाच पन्नास हजारात मिळणाऱ्या प्रसिद्धीचा मोह टाळून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करा, वाडीवाडीतील नव्हे तर तालुक्याचे संघ निवडा त्यातून जिल्ह्याचा सर्वोत्तम संघ अशा प्रकारे कबड्डी जोपासली तरच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू या कोकणात, कबड्डीच्या जन्मभूमीत निर्माण होतील. मात्र त्यासाठी आपले राजकीय हितसंबंध जोपासण्या पेक्षा कबड्डी जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तीस पस्तीस वर्षांपूर्वी वाघजाई साडवली, जुगाई कोसुंब, सोळजाई देवरुख, संघर्ष चिपळूण, महापुरुष रत्नागिरी, केळशी दापोली या कबड्डी संघांचा जिल्ह्यात दबदबा होता, अशोक शिंदे, शैलेश सावंत, प्रशांत सुर्वे असे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महान कबड्डीपटू या जिल्ह्याने दिले आज चिपळूण सोडले तर इतर संघ कुठे आहेत? अशा पंचक्रोशी मर्यादित व निमंत्रितांच्या स्पर्धा भरवून या खेळाला आपण खुजं करण्याचा अपराध करीत आहोत हे थांबवणे कबड्डी साठी अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी खर्च होणारा पैसा गावातील क्रीडांगण, अद्ययावत व्यायामशाळा यासाठी वापरता येईल.याबरोबरच अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा व बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करून वाडीवाडीतील, गावातील तरुणांना आळशी व निरुद्योगी बनवण्याची कारस्थाने सुरु आहेत. डिसेंबर ते जून म्हणजे या रिकामटेकड्या तरूणांना सुगीचा हंगाम, रात्रभर जागरण त्यामुळे सकाळी दहा वाजले तरी हे महाशय अंथरूणातच, आईवडील मरमर मरतात त्याचे काही देणेघेणे नाही. मात्र दिवसरात्र बाहेर असल्यामुळे व्यसनी झालेले, बिघडलेले अनेक तरुण आढळतात. या स्वस्त प्रसिध्दीच्या नादात, पंचवीस, तीस वर्ष उलटून जातात, जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
तीच तर्हा बैलगाडी शर्यतीची, एकीकडे कोकणातील शेती ओस पडत चालली, गुरेढोरे गेली, तसे गुरांचे गोठे गेले मात्र बैलगाडी स्पर्धा बघायला हजारोंची गर्दी? त्या बकासुर बैलाचे वर्णन करताना आमच्या लोकांना धाप लागते. कोकणात जमीन सारवायला शेण मिळत नाही, किंवा चहाला दुध नाही, याची लाज बाळगायची की घाटावरच्या खिल्लारी खोंडांचे कौतुक करायचे? कौतुक जरूर केलं पाहिजे कारण चांगल्याला चांगलं म्हणणे ही आपली संस्कृती आहे.पण आपली शेतीवाडी आपली गुरेढोरे याची पण आठवण ठेवली पाहिजे. मित्रांनो हा शहाणपण शिकवण्याचा हेतू नाही, पण आपले आईवडील, घरदार, शेतीवाडी आणि स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करा आणि हे स्थिर झाल्यावर हे छंद जोपासा.
©️ विजय लक्ष्मणराव जाधव, साडवली