(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्री खडगेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचा सोहळा भक्तीभावात साजरा करण्यात आला. मंदिर परिसर हजारो दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.
या प्रसंगी मंदिरात सकाळपासूनच पूजा-अर्चा, अभिषेक आणि आरतीचे धार्मिक विधी पार पडले. मंदिरातील शिवलिंगाची पूजा सुरेश गुरव यांनी केली, तर पूजाअर्चा सुबोध करकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. संध्याकाळी मंदिर परिसरात सजविण्यात आलेल्या दीपमालांनी वातावरण दिव्य झाले होते.
भाविकांनी मंदिर परिसरात एकत्र येऊन दीप प्रज्वलित केले. या मनमोहक दीपोत्सवाचे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आले असून, दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या मंदिराचे दर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी आयोजित केला जाणारा हा दीपोत्सव स्थानिक भाविक आणि ग्रामस्थांसाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा ठरतो. यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भगवान शंकराचे दर्शन घेतले आणि दीपोत्सवाचा आनंद लुटला.

