(रत्नागिरी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इ. ११वी कला शाखेतील १९९० या वर्षातील विद्यार्थी नुकतेच ‘अपरांत ग्रुप’च्या माध्यमातून सलग दुसऱ्यावर्षी महाविद्यालयात एकत्र आले. यावेळी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पुरस्कार वितरण, गुणगौरव आणि वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना आपले सर्व आवडते प्राध्यापक आपल्याला भेटले अशा भावना व्यक्त केल्या. ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांचे ऋण फेडणे आवश्यकच; खूप वर्षांनी त्यांचे परत आशिर्वाद लाभले. आपल्या आई-वडीलांनंतर आपल्याला नि:स्वार्थीपणे मोठे होताना पाहणारे फक्त तेच असतात. अशा भावनेने सर्व गुरुजनांना एकत्र आणून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रुपतर्फे यावर्षापासून ‘अपरांत रत्न पुरस्कार’ देण्यास प्रारंभ झाला. कोकण पर्यटनाची मान उंचावणारे, कोकणची बोलीभाषा सर्वदूर पसरवणारे आणि एकूणच कोकणातील पर्यटनाच्या वाढीला हातभार लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री. संदीप पावसकर. रत्नागिरी शहरालगत तोणदे गावामध्ये ते आपला व्यवसाय करतात. समाज माध्यमावर ते प्रसिद्ध असून अनेक पर्यटकांनी त्यांच्या कलेला उत्स्फूर्तपणे दाद दिलेली दिसून येते. समाज माध्यमावर त्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. इ. ११वी कला वर्गाची १९९० या वर्षीतील माजी विद्यार्थ्यांच्या ‘अपरांत ग्रुप’तर्फे त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना ‘अपरांत रत्न पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा उदयोन्मुख अभिनेता शुभम शिवलकर याचा हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागामध्ये प्रथमच मेजर रॅक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. सीमा कदम यांनाही गौरविण्यात आले. यानंतर शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. वर्षा संजय शिंदे आणि कु. योगिनी श्रीकांत मुळ्ये या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देण्यात आल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, माजी क्रीडा संचालक प्रा. मदन भास्करे, डॉ. सीमा कदम, रत्न नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री. राहुल पंडित, सौ. नेत्रा राजेशिर्के, श्री. राजेंद्र सावंत, श्री. विवेक देसाई, सौ. शितल मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ११वी कला वर्गाची १९९० बॅच, एन.सी.सी. तसेच कॉलेज कट्टा ग्रुपचे माजी विद्यार्थीही बहुसंख्येने उपस्थित होते. श्री. प्रीतम बनप याने सादर केलेल्या अप्रतीम ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत सनगरे यांनी केले.
यानंतर श्री. संदीप पावसकर यांनी आपल्या विनोदी शैलीत आपल्या पर्यटन कार्याची दाखल घेऊन दिलेला ‘अपरांत ग्रुप’चा पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. हा पुरस्कार आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहील असे सांगितले. एन.सी.सी.ची मेजर रॅक प्राप्त केलेल्या रत्नागिरीतील प्रथम महिला अधिकारी डॉ. सीमा कदम यांनीही आपल्या या बहुमानाची सर्वप्रथम दाखल घेऊन जो सत्कार केला; त्याबद्दल ग्रुपचे आभार मानले. आजी माजी प्राचार्य आणि क्रीडा मार्गदर्शक आणि माजी एन.सी.सी. विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहील असे मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले. युवा कलाकार शुभम शिवलकर याने आपले गुरुवर्य आणि माजी विद्यार्थी यांनी आपला जो सन्मान केला त्याबद्दल विशेष आभार मानले. यानंतर व्यासपीठावरील ज्येष्ठ गृरुवार्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एक मान्यवर आणि ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक प्रा. मदन भास्करे यांनी कार्यक्रमाला त्यांनी सदिच्छा व्यक्त करताना सांगितले की, माझ्या समोरील अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले असून आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे. या उत्कृष्ट आणि सुनियोजित कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले.
डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या काळातील एन.सी.सी.तील विद्यार्थी सहभाग, विविध कॅम्प आणि क्रीडा विभागातील तसेच महाविद्यालयातील अनेक आठवणींना उजाळा दिला. अपरांत ग्रुपच्या स्त्युत कार्याचा विशेष उल्लेख करून उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना या सन्मान सोहळ्यासाठी आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी ‘अपरांत ग्रुप’ने हाती घेतलेले कार्य अतिशय स्तुत्य असून कोकण पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, कोकणासाठी विशेष सन्मान प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती यांना समाजासमोर आणून ‘अपरांत रत्न’ सारखे पुरस्कार देणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या १९९० वर्षातील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. अशा कार्यक्रमांसाठी महाविद्यालय नेहमीच सहकार्य करेल असे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या सध्याच्या कार्याचा आणि प्रगतीचा आढावा घेतला.
यानंतर सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. माजी विद्यार्थ्यांच्या गायन, नृत्य आणि नाट्य यांनी कार्यक्रमाला शोभा आणली. सचिन लांजेकरने एक दमदार गीत गाऊन सर्वांची मने जिंकली. नीलम दळी खूपच भाव खाऊन गेली आणि तिने खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन दिमाखदार बनवायला सुरवात केली. पल्लवी, मीना आणि भारतीचा ग्रुपडान्स दिलखेचक झाला. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगतच गेला. यतीन-अनघा, यतीन-नेहा यांचे कपल डान्स झक्कासच, नेहा, माया यांचे सोलो डान्स सुंदरच झाले पण नेहा थत्तेचा हवा हवाई लय भारी. नितीन मिरकर, संजय शिंदे, प्रीतम बनप, रश्मी किर, बंटी गुरव यांनी देखील सुरेल गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केलं. पण हृदयात कोरला गेला संदेश कुवारने नाट्य छटेद्वारे केलेला दमदार अभिनय. कार्यक्रम जवळपास पाच तास चालला आणि पूर्ण वेळ आपल्या सुश्राव्य वाणीने आणि ओघवत्या शैलीने कार्यक्रमाचे निवेदन करून प्रशांत सनगरे यांनी त्यात जिवंतपणा आणला. सुग्रास स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
दुसऱ्या दिवशी ग्रुपची सहल संपन्न झाली. गुहागर याठिकाणी ही सहल आयोजित करण्यात आली होती. ऐन उन्हाळातील ही सहल बहारदार वरूणराजाच्या उपस्थितीत पावसाळी सहल ठरली. भातगाव पुलावरचे फोटो, रील, सेल्फी मनमोहक. हेदवीच्या बाप्पाचे दर्शन, अन्ताक्षरी यामुळे ही सहल कायम अविस्मरणीय राहील. गुहागर येथील खातू दाम्पत्याने केलेले सर्वांचे विशेष स्वागत सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारे ठरले.
पुरस्कार प्रदान सोहळा आणि स्नेहसंमेलन संपन्न होण्यासाठी नितीन मिरकर, गणेश जोशी, चंद्रकांत मांडवकर, अभिजित शेट्ये, उत्पल वाकडे, प्रीतम बनप, सुधीर पटवर्धन, नितीन कारंबेळे, मीना तेंडुलकर, सायली वायंगणकर, लीना पाटील, पल्लवी मिरकर, भारती मलुष्टे, दिनेश रेमुळकर, यतीन दामले, सचिन लांजेकर, विजय मलुष्टे, रुपेश मयेकर, शबनम झारी आणि अनेकांनी परिश्रम घेतले. उदयराज सावंत यांनी ध्वनी आणि लाईटची व्यवस्था नेहमी प्रमाणे दर्जेदार ठेवली. या सर्वांमुळेच द्वितीय वर्षातील स्नेहसंमेलन विशेष संस्मरणीय होण्यास मदत झाली.