(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील काजिर्डा-जामदा परिसरात प्रस्तावित जामदा प्रकल्पाविरोधातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून, प्रशासनाच्या आश्वासनांवर नाराजी व्यक्त करत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. २६) सकाळी काजिर्डा-राणेवाडी मार्गावर तीव्र आंदोलन छेडले. आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे.
जामदा प्रकल्प संघर्ष समिती, काजिर्डा-राणेवाडी यांच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना यापूर्वीच निवेदने सादर करण्यात आली होती. तहसीलदार राजापूर यांना दिलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने घोषित केलेल्या १०० टक्के पुनर्वसन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकल्पासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ, मुंबईस्थित नागरिक तसेच प्रशासन यांच्यात अनेक बैठका आणि ग्रामसभांमध्ये चर्चा झाली होती; मात्र शासनाच्या निकषांनुसार योग्य निर्णय न झाल्याने नागरिकांमधील नाराजी अधिकच तीव्र झाली आहे.
काही अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गावागावांत अविश्वास आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत २६ मे रोजी उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाने आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला; मात्र आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही ठिकाणी शाब्दिक चकमकी झाल्याचेही पाहायला मिळाले. ‘आधी पूर्ण पुनर्वसन, मगच धरण’ ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असून, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या गर्दीतून पोलीस वाहनांच्या मदतीने मोजणीसाठी अन्य वाहने गावात नेण्यात आल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेपेक्षा मोजक्या फुटीर घटकांना पाठबळ दिल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत असून, “आमच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा जामदा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक आमदार किरण सामंत यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, नितीन काजारे, पिंट्या आर्डे, पिंट्या गुरव, मंगेश नारकर, चंद्रकांत सावंत, कृष्णा आर्डे, प्रदीप चंदूरकर, दिपक पालकर, बारक्या मांडवकर, तुकाराम नारकर, विनोद आर्डे, गोपाळ पालकर यांच्यासह महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

