(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रविवारी सकाळी अवघ्या दोन-तीन तासांसाठी झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी रत्नागिरीकरांना उकाड्यापासून काही काळ दिलासा दिला; मात्र त्यानंतर पुन्हा उन्हाचा तडाखा आणि दमट वातावरणामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. हवामान खात्याने सोमवार आणि मंगळवारीही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता; परंतु पावसाने दोन्ही दिवशीही जिल्ह्याला हुलकावणी दिली.
रविवारी (दि. २५) सकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. रत्नागिरीसह सर्व तालुक्यांत सुमारे दोन तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात काही काळ सुखद गारवा निर्माण झाला होता. मात्र, पाऊस ओसरताच पुन्हा लख्ख ऊन पडले आणि उष्णतेचा चटका अधिक तीव्र जाणवू लागला. सोमवारी दिवसभर आकाशात ढगांची दाटी होत असल्याने पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. नागरिकांनाही पावसाची अपेक्षा होती; मात्र दिवसभर सूर्यानेच आपली तीव्रता कायम ठेवली. वाढलेल्या दमटपणामुळे घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले होते. सायंकाळनंतर तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र रात्रीपर्यंत पावसाने दर्शन दिले नाही. मंगळवारीही अशीच परिस्थिती कायम राहिली.
दरम्यान, हवामान खात्याने २५ ते ३० मेदरम्यान जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली वाढत असल्या तरी अद्यापही जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने उकाड्याची तीव्रता वाढत चालली आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर गारवा वाढण्याऐवजी रात्रीपासून उष्णता आणि दमटपणात अधिक वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात तरी जोरदार पाऊस होऊन वातावरणात दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आता रत्नागिरीकर व्यक्त करत आहेत.

