(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये एक वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. कारवाईचा फटका एका विभागाला बसला असला, तरी त्याची धास्ती मात्र अनेक कार्यालयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. परिणामी, काही ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती वाढल्याचे बोलले जात आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची सर्वाधिक तक्रार असते ती अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची. दुपारच्या जेवणाची वेळ संपूनही काही अधिकारी तासन्तास कार्यालयात परतत नसल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना केबिनबाहेर प्रतीक्षाच करावी लागते. एखाद्या स्वाक्षरीसाठी किंवा साध्या मार्गदर्शनासाठीही नागरिकांचा वेळ वाया जात असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. याशिवाय, “व्हीसी सुरू आहे”, “साहेब बैठकीत आहेत”, “थोड्या वेळाने या” अशी कारणे देत प्रत्यक्ष भेट टाळण्याचीही काही कार्यालयांतील पद्धत नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आली आहे. त्यामुळे कार्यालयात अधिकारी आहेत की नाहीत, हा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो.
शनिवार-रविवारची सुट्टी जोडून शुक्रवारीच कार्यालयातून गायब होण्याची प्रवृत्ती काही शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही कायम असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. आठवड्याच्या अखेरीस रजा, दौरा किंवा अन्य कारणांचा आधार घेत काही अधिकारी खुर्ची रिकामी ठेवत असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र विनाकारण फरफट होत असल्याची तक्रार वारंवार ऐकायला मिळते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातच शिस्तभंगाची कारवाई झाल्यानंतर वातावरणात बदल जाणवू लागल्याची चर्चा आहे.
काही कार्यालयांमध्ये सकाळी वेळेवर उपस्थिती, दुपारनंतर तत्काळ कामावर पुनरागमन आणि नागरिकांच्या भेटींसाठी उपलब्ध राहण्याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे बोलले जात आहे. प्रशासकीय वर्तुळात तर मिश्किलपणे एक वाक्य ऐकू येऊ लागले आहे “आता घड्याळाकडे पाहूनच कार्यालयात ये-जा सुरू झाली आहे!” अर्थात, ही चर्चा असली तरी त्यातून प्रशासनातील शिस्त आणि नागरिकाभिमुख कामकाजाबाबत अपेक्षा अधिक बळावल्याचे दिसून येते.
शिस्तभंगाच्या कारवाया या केवळ शिक्षा देण्यासाठी नसतात, तर प्रशासन अधिक जबाबदार, पारदर्शक आणि नागरिककेंद्री बनावे, हा त्यामागील उद्देश असतो. अलीकडील शिस्तभंगाच्या कारवायांनंतर मात्र अशा कार्यपद्धतीवर काही प्रमाणात लगाम बसेल आणि अधिकारी वेळेचे व जबाबदारीचे भान ठेवून नागरिकांना अधिक तत्पर सेवा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता हा बदल काही दिवसांचा ठरतो की कायमस्वरूपी कार्यसंस्कृतीत रूपांतरित होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अखेर बदलीच्या लिस्टमध्ये नाव येताच बिस्तारा गुंडाळला
महामार्गालगत असलेल्या एका कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध स्तरांवर जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगत होती. ह्या अधिकारी कार्यालयात आठवड्यातील दोनच दिवस येऊन आठवडाभराची “विशेष कामगिरी” करत असत. हा सर्व प्रकार नाव न घेण्याच्या अटीवर सांगितला होता. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वरिष्ठांकडेही अनेकदा तक्रारी पोहोचल्या होत्या. अल्पावधीतच त्या अधिकाऱ्यांची प्रतिमा ‘वादग्रस्त अधिकारी’ अशी तयार झाल्याची चर्चा संबंधित विभागात रंगत होती. दरम्यान, वर्षभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर अखेर त्या महिला अधिकाऱ्यांनी ‘बिस्तारा गुंडाळून’ बदलीची ऑर्डर हाती घेतली; मात्र त्यांच्या कार्यपद्धतीच्या चर्चा अजूनही प्रशासनाच्या कॉरिडॉरमध्ये अधूनमधून रंगत असल्याचे बोलले जात आहे.

