(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजीकच्या फणसोप येथील टाकळेवाडीत यंदाचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार असून शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि परंपरेच्या साक्षीने साजरा होणारा हा शिमगोत्सव परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा व एकात्मतेचा सोहळा ठरणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्री देव लक्ष्मीकेशव मंदिर येथून श्री देव लक्ष्मीकेशवांची पालखी टाकळेवाडीकडे प्रस्थान करणार आहे. वाडीतील ग्रामस्थांच्या घरी पारंपरिक पद्धतीने ‘घरे घेणे’ हा विधी पार पडणार असून, त्यानंतर पालखी दत्तमंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न होईल. सायंकाळी ८ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री १० ते ११ या वेळेत भजनाचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम रंगणार असून, मध्यरात्री १२ वाजता सवाद्य पालखी मिरवणुकीने शिमगोत्सवाचा मुख्य सोहळा प्रारंभ होईल. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेली ही मिरवणूक ग्रामदैवताच्या जयघोषात टाकळेवाडी परिसर दुमदुमवणार आहे. मिरवणूक संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिलणकर कुटुंबाच्या मूळ घरात पालखीची आरती व गाऱ्हाणे विधी पार पडतील. त्यानंतर पालखी पुन्हा फणसोप येथील देवळाकडे प्रस्थान करणार आहे.
शिमगोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा तसेच पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव लक्ष्मीकेशव उत्सव मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष जगदीश साळवी यांनी भाविकांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामूहिक एकोप्याची जपणूक करणारा टाकळेवाडीचा शिमगोत्सव यंदाही भक्तिभावाच्या वातावरणात पार पडणार असून, परिसरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे.

